स्वातंत्र्यदिनानिमित्ताने वीर माता-पित्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:21 AM2021-08-17T04:21:57+5:302021-08-17T04:21:57+5:30
नाशिक : स्वातंत्र्यदिनानिमित्ताने आयोजित ध्वजारोहण समारंभप्रसंगी भारतमातेसाठी बलिदान देणाऱ्या जिल्ह्यातील वीर जवानांच्या पत्नी, मात-पित्यांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ...
नाशिक : स्वातंत्र्यदिनानिमित्ताने आयोजित ध्वजारोहण समारंभप्रसंगी भारतमातेसाठी बलिदान देणाऱ्या जिल्ह्यातील वीर जवानांच्या पत्नी, मात-पित्यांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ताम्रपट देऊन त्यांचा गौरव झाला.
विभागीय आयुक्त कार्यालय येथे झालेल्या सोहळ्याप्रसंगी देशातील सीमारेषेवर लष्करी कार्यवाही करताना सन-२०१९ मध्ये बालाकोट हवाई हल्ला सुरू असतांना बडगाव जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना २७ फेब्रुवारी २०१९ रोजी हेलिकॉप्टर क्रॅश झालेमुळे स्क्वाड्रण लिडर निनाद अनिल मांडवगणे, रा. नाशिक हे शहीद झाले. त्यांच्या वीर पत्नी, वीर माता व पिता यांना महाराष्ट्र शासनातर्फे एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला.
३ मार्च २०१८ रोजी नायक नीलेश अहिरे यांना ऑपरेशन रक्षक दरम्यान जम्मू व काश्मीर येथे कर्तव्यावर असताना जेव्हा त्यांची सैन्य तुकडी पेट्रोलिंग करत होती आणि त्यावेळी भूसुरुंगाचा स्फोट झाल्याने त्यांना अपंगत्व आले. सबब महाराष्ट्र शासनातर्फे साडेआठ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली.
२६ मार्च २०१८ रोजी शिपाई रावसाहेब भोकरे यांना ऑपरेशन रक्षक दरम्यान जम्मू व काश्मीर येथे कर्तव्यावर असताना अपंगत्व आले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली.
--इन्फो--
जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालय यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये एसएमबीटी महाविद्यालय, नामको हॉस्पिटल नाशिक, सुपर स्पेशालिटी हास्पिटल, नाशिक या रुग्णालयांचा सन्मान करण्यात आला.