गोदाकाठ परिसरात हुडहुडी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:24 AM2020-01-18T00:24:09+5:302020-01-18T01:13:48+5:30
थंडीची तीव्रता पुन्हा वाढली असून, शुक्रवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. निफाड तालुक्यात किमान तापमान २.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून, परिसर थंडीने गारठला आहे.
लासलगाव/निफाड/खेडलेझुंगे : तालुक्यात थंडीची तीव्रता पुन्हा वाढली असून, शुक्रवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. निफाड तालुक्यात किमान तापमान २.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून, परिसर थंडीने गारठला आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे गोदावरी किनाऱ्यावरील खेडलेझुंगे, रूई, थडीसारोळे, कोळगाव, कानळद आदी गावांसह परिसर गारठला आहे. राज्यात सर्वाधिक थंडी पुन्हा निफाड तालुक्यात परतली आहे. थंडीमुळे शेतपिकांवर दवबिंदू साचलेले आहे. आजच्या नीचांकी तापमानामुळे पिकांवर हिमकण आढळून आले आहेत. परिसरात पहाटे धुके दाटून येते. शुक्रवारी तर पाण्यातून वाफा निघताना दिसून येत होत्या. एकूणच सातत्याने घसरत असलेल्या तापमानामुळे पुन्हा एकदा निफाड तालुक्यात राज्यातील सर्वात नीचांकी तपमानाची नोंद शुक्रवारी झाली. परिसरातील वाढत्या थंडीमुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा वापर करावा लागत आहे. तसेच महिलावर्गही
स्वेटर, शॉलचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत. परिसरात थंडीचा जोर वाढत असून, नागरिकांनी उबदार
कपड्यांचा आधार घेण्यास सुरु वात केली आहे. गेल्या पंधरवड्यात थंडीने परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात परिसरातील किमान तापमान आठ अंशाच्या जवळपास राहिले होते. दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, पेपर विक्रेते, सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेले लोकही गारठले होते.
द्राक्षमण्यांना तडे, उत्पादक चिंतित...
गुरु वारी ९.२ अंशावर असणारे तापमान दुपारनंतर खाली येऊ लागले अन् सायंकाळी गाव वाडी-वस्तीवर शेकोट्या पेटल्या. अवघा तालुका थंडीने गारठला आहे. शुक्रवारी सकाळी कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रावर २.४ अंश तापमानाची नोंद झाली. तापमानात अचानक घट झाल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाला असून, द्राक्षमण्यांना तडे जाणे, पाने सुकणे, मुळ्याची वाढ खुंटणे असे प्रकार वाढणार आहेत. त्यामुळे द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकरी भल्या पहाटे बागेत चिपाटे पेटवून ऊब तयार करीत आहे. मात्र वाढती थंडी गहू, कांदा, हरभरा पिकांसाठी पोषक ठरू लागली आहे.