सहा हॉटेलमध्ये चालणारा हुक्का बार पोलिसांनी उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 01:26 AM2022-06-01T01:26:30+5:302022-06-01T01:27:04+5:30

शहर व परिसरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सहा हॉटेलमध्ये चोरीछुप्या पद्धतीने ‘हुक्का बार’ चालविला जात होता. पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये जागतिक तंबााखू विरोधी दिनानिमित्त गुन्हे शाखा युनिट १, २ व मध्यवर्ती पथकाने सर्वत्र छापे मारले. या विशेष कारवाईत एकूण १४ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तसेच ६४ हजार ३९० रुपयांच्या हुक्काचे साहित्य व तंबाखूजन्य पदार्थांचा माल जप्त करण्यात आला आहे.

Hookah bars operating in six hotels were smashed by police | सहा हॉटेलमध्ये चालणारा हुक्का बार पोलिसांनी उधळला

सहा हॉटेलमध्ये चालणारा हुक्का बार पोलिसांनी उधळला

Next
ठळक मुद्देधडक छापे : तंबाखूविरोधी दिनानिमित्त गुन्हे शाखेची विशेष कारवाई; चौदा संशयितांवर गुन्हे

नाशिक : शहर व परिसरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सहा हॉटेलमध्ये चोरीछुप्या पद्धतीने ‘हुक्का बार’ चालविला जात होता. पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये जागतिक तंबााखू विरोधी दिनानिमित्त गुन्हे शाखा युनिट १, २ व मध्यवर्ती पथकाने सर्वत्र छापे मारले. या विशेष कारवाईत एकूण १४ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तसेच ६४ हजार ३९० रुपयांच्या हुक्काचे साहित्य व तंबाखूजन्य पदार्थांचा माल जप्त करण्यात आला आहे.

शहर पोलीस आयुक्तालयाच्या काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्रासपणे हुक्का बार हॉटेलमध्ये अवैधरीत्या सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त होत होत्या. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी उपायुक्त संजय बारकुंड यांना याबाबत लक्ष घालून जागतिक तंबाखू विरोधी दिनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ, आंचल मुदगल व आनंद वाघ यांची बैठक घेत स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. या पथकांनी संशयित हॉटेलमध्ये धडक देत मंगळवारी (दि.३१) सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेच्या कालावधीत कारवाई केली. यामध्ये गंगापुर पोलीस ठाणे हद्दीतील सावरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल कोबल स्ट्रीट तसेच त्याच भागातील हॉटेल बारकोमध्ये धाड टाकली गेली. काॅलेजरोडवरील हॉटेल एअर बार, मुंबईनाका येथील एका हॉटेलच्या तळमजल्यात भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल शांती इन, इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील गौळाणे रोडवरील हॉटेल तात्याबामध्ये छापेमारी साध्या वेशातील पोलिसांनी केली. एकूण १४ संशयितांना ताब्यात घेत संबंधित पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. शहरात एकाचदिवशी प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने हुक्का बार चालविणाऱ्या हॉटेलवर कारवाई केली गेली. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांनी अशाचप्रकारे कारवाईचा दणका अधूनमधून दिल्यास तरुणाई व्यसनाधीन होण्यापासून सुरक्षित राहण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे.

Web Title: Hookah bars operating in six hotels were smashed by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.