'हुक्का' टोळीचे तीघे ताब्यात; आठ घरफोड्या उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 07:29 PM2021-01-28T19:29:39+5:302021-01-28T19:34:32+5:30
या तीनही संशयितांना पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्यांनी मुंबईनाका पोलिसांच्या हद्दीतील सहा व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील दोन अशा एकुण आठ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
नाशिक : सराईत गुंडांना दोन वर्षांकरिता शहरासह जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असतानाही ते पोलिसांच्या डोळ्यांत धुळफेक करत शहरात वावरत सर्रासपणे बंद घरांचे कुलुप तोडून मौल्यवान वस्तुंवर डल्ला मारत होते. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या पथकाने 'हुक्का' टोळीच्या दोघा सराईत तडीपार गुंडांसह त्यांच्या एका साथीदाराला बेड्या ठोकल्या आहे. त्यांच्याकडून सुमारे घरफोड्यांचे आठ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
शहरातील मुंबईनाका, भद्रकाली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत होणाऱ्या घरफोड्यांच्या घटना रोखण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्याकरिता सहायक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या पथकाला तपास करुन संशयितांच्या मुसक्या बांधण्याचे आदेश दिले होते. यानुसार सहायक पोलीस निरिक्षक के.टी.रौंदळे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे सापळा रचून संशयित तडीपार गुंड बब्बु पप्पु अन्सारी ऊर्फ सोहेल, वसीम अब्दुल रहेमान शेख यांना शिताफीने अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांचा दुसरा साथीदार संशयित दिपक पितांबर गायकवाड यासही पोलिसांनी अटक केली. या तीनही संशयितांना पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्यांनी मुंबईनाका पोलिसांच्या हद्दीतील सहा व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील दोन अशा एकुण आठ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
या चोरट्यांकडून घरफोड्यांमध्ये लांबविलेले १८ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची नथ, चांदीचे ताट, फुलपात्रे, चार लॅपटॉप, मिनी गॅस सिलिंडर शेगडी, आयफोन, मिक्सर, स्टीलची पंचपात्री, जर्मनचे डब्बे असा सुमारे ४ लाख ५५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या तीघांची कसून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.