नासाका सुरु होण्याची आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:15 AM2018-03-01T01:15:51+5:302018-03-01T01:15:51+5:30
राज्यातील बंद असलेल्या कारखान्यांचे सर्वेक्षण करून चालू होण्याच्या स्थितीत असलेल्या कारखान्यांना मदतीचा हात देऊन ते आगामी हंगामात सुरू करण्याचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
नाशिकरोड : राज्यातील बंद असलेल्या कारखान्यांचे सर्वेक्षण करून चालू होण्याच्या स्थितीत असलेल्या कारखान्यांना मदतीचा हात देऊन ते आगामी हंगामात सुरू करण्याचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. साखर आयुक्तालयाच्या आदेशान्वये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाने नाशिक सहकारी साखर कारखान्यास भेट देत परिस्थितीची पाहणी केली. नासाकाची स्थिती चालू होण्यासाठी अनुकूल असल्याचे प्रथमदर्शनी मत व्यक्त केल्याने आगामी गळीत हंगामात नासाका सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आर्थिक अडचणीमुळे नासाकाचा गळीत हंगाम बंद आहे. या काळात कारखाना कार्यक्षेत्रातून दोन लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊस प्रतिवर्षी बाहेरील कारखान्यांना गेला आहे. चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नासाका कारखान्यावर अवसायक नेमून वाढणाºया व्याजाला ब्रेक लावला आहे. सद्यस्थितीत नासाकावर जिल्हा बँकेचे ८४ कोटी कर्ज व व्याज थकीत आहे. या पाहणीचा अहवाल साखर आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविला जाईल. त्यानंतर त्यावर निर्णय होणार असल्याचे रेपाळे व देसाई यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुधाकर गोडसे, केमिस्ट हरी दळवी, अभियंता रणजित सहाणे, शेतकी विभागाचे विष्णुपंत गायखे, कामगार युनियनचे शिवराम गायधनी, नामदेव बोराडे, सुरेश दळवी, बी. बी. काकड, गेनू आडके, विठ्ठल घुले, खंडेराव आडके आदी उपस्थित होते.
यावेळी माजी अध्यक्ष तानाजी गायधनी, अशोक खालकर यांनी रेपाळे व देसाई यांची भेट घेऊन कुठल्याही परिस्थितीत कारखाना सुरू व्हावा, अशी मागणी केली.
राज्य शासनाने १७ फेब्रुवारी रोजी साखर आयुक्त संभाजीराव कडू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक बोलावून सुरु होऊ शकणाºया २८ पैकी पहिल्या टप्प्यातील दहा कारखान्यांची आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये नासाकाचा समावेश होता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ. जुगलकिशोर रेपाळे, अभियंता सुहास देसाई यांनी बुधवारी कारखान्याची मशीनरी, गव्हाण, गुदाम, स्टोअर, मिल आदींची पाहणी करून कर्मचाºयांकडून तांत्रिक बाबींची माहिती घेतली.