आशा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मध्यस्थी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:11 AM2021-06-22T04:11:06+5:302021-06-22T04:11:06+5:30
नाशिक : महाराष्ट्रभरातील ४ हजार गटप्रवर्तक, ५८ हजार आशा १५ जूनपासून विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी ...
नाशिक : महाराष्ट्रभरातील ४ हजार गटप्रवर्तक, ५८ हजार आशा १५ जूनपासून विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून आशा व गटप्रवर्तकांच्या समस्या व मागण्या त्यांच्यासमोर मांडाव्यात, अशी मागणी आशा व गटप्रवर्तक कृती समितीतर्फे संभाजीराजे छत्रपती यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
नाशिक येथे सोमवारी (दि.२१) मराठा मूक आंदोलनप्रसंगी खासदार संभाजीराजे यांची भेट घेत कृती समिती निमंत्रक व आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी निवेदन दिले, तसेच मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यासोबत बोलून गटप्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना कोरोना योद्धाचा सन्मान मिळावा यासाठी मध्यस्थी करण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली, तसेच आशा व गटप्रवर्तकांना किमान वेतन देऊन दरमहा मानधनात वाढ करावी, कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, शासनाच्या नोकर भरतीत ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे गट प्रवर्तक, आशा ना प्राधान्य देऊन, जिल्हा परिषद, मनपा नोकर भरतीत जागा राखीव ठेवण्यात याव्यात, आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
===Photopath===
210621\21nsk_44_21062021_13.jpg
===Caption===
खासदार संभाजीराजे यांना निवेदन देताना गट प्रवर्तक व आशा कर्मचारी