जिल्हा प्रशासनाचे वरातीमागून घोडे
By admin | Published: June 1, 2016 10:22 PM2016-06-01T22:22:46+5:302016-06-01T22:29:42+5:30
आत्महत्त्येवर उतारा : कर्जदारांचे घेणार मेळावे
नाशिक : यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होऊन सरासरीपेक्षाही समाधानकारक पाऊस होण्याचे भाकीत हवामान खात्यापासून ते पंचांगकर्त्यांनीही व्यक्त केल्यामुळे आशा पल्लवित झालेले कर्जदार शेतकरी संपूर्ण महिनाभर शेतीच्या मशागतीत संपूर्ण कुटुंबासह जुंपलेले असताना आता मान्सूनच्या तोंडावर त्यांचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे आत्महत्त्या करण्यापासून कर्जदार शेतकऱ्याला रोखण्यासाठी प्रशासनाने मे महिन्याच्या अखेरच्या दिवशी कार्यशाळा घेऊन लवकरच कालबद्ध कार्यक्रम ठरवून देण्याचे निश्चित केले असून, पाऊस पडल्यावर शेतकरी मेळाव्यास येतील की शेतीची कामे करतील, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत ४१ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या असून, सरासरी महिन्याला आठ शेतकरी आत्महत्त्या करीत असल्याने प्रशासन गेल्या काही महिन्यांपासून नुसत्याच चिंतित आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शासनाने काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली असली व त्यानुसार तहसीलदारांनी कार्यवाही करण्याचे आदेशही यापूर्वी देण्यात आले, परंतु त्याकडे दुर्लक्षच करण्यात आल्याने आत्महत्त्यांचे प्रमाण कमी होऊ शकले नाही. त्यामुळे पुन्हा एकवार व्यापक प्रयत्न करण्याचे निश्चित करून कर्जदार शेतकऱ्यांचा शोध घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला व त्यांना त्यापासून रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती तसेच समुपदेशनाची पद्धती ठरविण्यासाठी मंगळवारी पंचवटीतील प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्व विद्यालय येथे महसूल अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यात जिल्हा बॅँकेकडून कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या घेऊन तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांमार्फत अशा शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना समुपदेशन करण्यासाठी गावोगावी मेळावे घेण्याचे तसेच त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. मुळात सध्या सर्व शेतकरी शेतीच्या मशागतीत जुंपले असून, यंदा मान्सून समाधानकारक राहणार असल्याने आत्तापासूनच शेतकऱ्यांचे खरिपाकडे लक्ष लागलेले आहे. गेल्या दोन वर्षांत नापिकीमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन त्यातून सावकारीतून मुक्त होण्याची संधी आहे. अशा परिस्थितीत प्रशासन शोध घेत असलेले कर्जदार शेतकरी हाती लागतील काय आणि हाती लागल्यावर ते मेळाव्यांना हजेरी लावतील की, शेतीच्या कामाला प्राधान्य देतील, असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)