शासनाचे वरातीमागून घोडे ; रब्बी पेरणी अखेरच्या टप्प्यात असताना दिली खरीप नुकसानींच्या पंचनाम्यांना परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 08:40 PM2017-10-27T20:40:45+5:302017-10-27T20:58:43+5:30
नाशिक : दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात जिल्हाभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे नुकसानग्रस्त भागांचे पीक पंचनामे करून तत्काळ मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. परंतु, ऑक्टोबर उलटल्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसान झालेले पीक शेतातून काढून रब्बी पेरणीची तयारी केली असताना, शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देत वरातीमागून घोडे मिरविण्याचा प्रकार केला आहे.
जिल्ह्यात परतीच्या पावसाचा सुमारे 50 हजार शेतकऱ्यांना फटका बसला असून, जवळपास 25 हजार हेक्टर क्षेत्रवरील पिके पावसामुळे बाधित झाली आहेत. यंदा चांगल्या पावसामुळे चांगले उत्पादन होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले, परंतु परतीच्या पावसाने शेतक:यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. जिल्ह्यातील 662 गावांतील 48 हजार 984 शेतक:यांचे अवकाळीने नुकसान झाले. जिरायत क्षेत्रतील भात, नागली, वरई, बाजरी, भुईमूग, उडीद, खुरासणी, सोयाबीन, मका या पिकांचे 12 हजार 888.55 हेक्टर, तर बागायती क्षेत्रतील 2639.64 हेक्टर क्षेत्रतील कांदा, ऊस व भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले असून, सर्वाधिक फटका द्राक्षपिकाला बसला. ऐन छाटणीच्या व झाडाने फूल धरण्याच्या काळातच बेमोसमी पाऊस झाल्याने झाडांची फुले गळून पडली, तर हाती आलेला कांदा भुईसपाट झाला. 10 हजार 274 हेक्टरवरील द्राक्षांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने प्राथमिक पातळीवर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मात्र शासनाकडून कोणतेही निर्देश नसल्याने पीक पंचनामे करण्यात आले नव्हते. आता ऑक्टोबर महिना उलटल्यानंतर शासनाला जाग आली असून, शेतकऱ्यांना शेतातील नुकसान झालेले रब्बीचे पीक काढून तेथे रब्बीची पेरणी अथवा पेरणीची तयारी सुरू केली आहे. परंतु शासनाच्या आदेशानंतर पंचनाम्यासाठी यंत्रणा कामाला लागणार असल्याने अधिकाऱ्यांना काय नुकसान दाखवावे, असा प्रश्न शेतऱ्यांसमोर उभा राहणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या तालुक्यांतील नुकसानीचे पंचनामे करण्यात येतात. मात्र, यावर्षी परतीच्या पावसाने पिके काढणीला आली असताना, अल्पावधीत मोठे नुकसान झाल्याने सरसकट पंचनामे करण्याची मागणी होत आहे. त्यातही आता 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांनाच नुकसानभरपाई मिळणार असल्याने किती शेतकरी यास पात्र ठरणार याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.