द्राक्षपंढरीत शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 07:12 PM2019-03-10T19:12:22+5:302019-03-10T19:14:50+5:30
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करताना शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. द्राक्षपंढरी अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्ष पिकाच्या भावात कमालीची घसरण झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.
पिंपळगाव/वनसगाव : कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करताना शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. द्राक्षपंढरी अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्ष पिकाच्या भावात कमालीची घसरण झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. भाव घसरल्याने वर्षातून एकदाच घेतल्या जाणाऱ्या पिकाचा खर्च वसूल होत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. निर्यातक्षम द्राक्षे अवघ्या २० ते २५ रु पये, तर लोकल १० ते १५ रु पये किलो यादराने विक्र ी होत असल्याने कांद्यासारखाच द्राक्षाने वांधा केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना युरोपीय देशात सर्वाधिक मागणी असते. शिवाय पाकिस्तान,बांगलादेश, नेपाळ, चीन या देशात निर्यात होतात. उत्तर भारतातील अनेक राज्यांत नाशिकच्या द्राक्षांना मागणी असते. द्राक्षलागवडीचा खर्च हा एकरी किमान चार ते पाच लाख रु पये असल्याने मोठे भांडवल खर्च करून पीक उभे करावे लागते.
नैसर्गिक आपत्ती आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती, बाजारात विक्र ीसाठी उपलब्ध असलेली अनेक फसवी औषधे, मजुरांचा वाढता भाव यामुळे बाग पिकवणे आणि टिकविणे जिकिरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत निर्यातक्षम द्राक्षाला किमान ८० ते ९० व लोकल द्राक्षाला ४५ ते ५० रु पये भाव मिळाला तर शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडते.