गारपीट : सिन्नरला आमदारांनी केली पाहणी; शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता
By admin | Published: February 11, 2015 11:30 PM2015-02-11T23:30:45+5:302015-02-11T23:31:07+5:30
बेमोसमी पावसाने पिकांचे नुकसान
सिन्नर : मंगळवारी रात्री झालेल्या गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी पिकांचे नुकसान झाले. पूर्व भागात गहू, कांदा , हरबरा व डाळींब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन-तीन महिन्यांत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहेत.
अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात यावर्षी तीन महिन्यात तीनवेळा अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा बसला आहे. यावर्षी पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे देवनदी बऱ्यापैकी वाहिली होती. त्यामुळे देवनदीकाठच्या गावांमध्ये रब्बीचे क्षेत्र वाढले होते. मात्र मंगळवारी सायंकाळी झालेली गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे पीक भुईसपाट झाले. वादळी वाऱ्याने व गारपीटीमुळे गव्हाचे पीक भुईसपाट झाल्याचे चित्र वडांगळी, खडांगळी व हिवरगाव या गावांमध्ये दिसून आले. आमदार राजाभाऊ वाजे यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा केला यावेळी वडांगळी येथील कैलास खुळे, गोपाळ भोकनर, रफीक शेख, सुदाम अढांगळे, संपत भोर, योगेश खुळे, दत्तात्रय खुळे, तुकाराम खुळे खडांगळी येथील यांच्यासह शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. (वार्ताहर)