शेतकऱ्यांनी केली दरपत्रकांची होळी
By admin | Published: July 10, 2017 12:16 AM2017-07-10T00:16:33+5:302017-07-10T00:17:12+5:30
पाथरे : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमिनीच्या थेट खरेदीसाठी दरपत्रक जाहीर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरे : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमिनीच्या थेट खरेदीसाठी जिल्हास्तरीय समितीने हेक्टरनिहाय शुक्रवारी दरपत्रक जाहीर केले. त्याविरोधात पाथरे येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत शासनाने जाहीर केलेल्या दरपत्रकाची होळी केली. यावेळी शेतकऱ्यांनी शासनविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.
प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महागार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या सिन्नर तालुक्यातील जमिनींना रेडीरेकनरच्या पाचपट अधिक मोबदला दिला जाणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने अधिकृत घोषणा केली आहे. जिल्ह्यात कमीतकमी ४० लाख ९९ हजार ६९५ रुपये तर सर्वाधिक ८४ लाख ७१ हजार ८२० रुपये इतका हेक्टरी दर जाहीर करण्यात आला आहे. दर घोषित केल्यानंतर जमीन अधिग्रहण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.पाथरे खुर्द व वारेगाव या गावातील शेतकऱ्यांनी शासनाच्या कृतीचा जाहीर निषेध करीत ‘समृद्धी’विरोधात लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शासनाला वेळोवेळी विरोधाची निवेदने, ग्रामसभांचे ठराव, मोर्चे आदीद्वारे शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. जर शासन आपल्या भूमिकेवर ठाम असेल तर शेतकरीही आपल्या भूमिकेवर ठाम राहणार आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या प्रकल्पग्रस्तांचे अनुभव पाहता प्रकल्पग्रस्तांना पुरेपूर लाभ मिळालेला नाही. त्यांच्या पिढ्यांचे हाल झाले आहे. हे सर्व पाहता पाथरेकरांचा समृद्धी महामार्गास ठाम विरोध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेले दर मान्य नसून एक इंचही जमीन देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी जाहीर केले. समृद्धी महामार्गास विरोध दर्शविण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र जमून दरपत्रकाची होळी केलीे. यावेळी वारेगावचे माजी सरपंच बाळासाहेब खळदकर, पाथरे खुर्दचे उपसरपंच सुखदेव गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, बाळासाहेब गुंजाळ, दिनकर गुंजाळ, निलेश गुंजाळ, बाळासाहेब राहणे, बंडू निकम, भीमाजी पवार, डॉ. राजेंद्र गुंजाळ, सुधाकर गुंजाळ, रमेश रहाणे, योगेश गुंजाळ, सविता गुंजाळ, निर्मला गुंजाळ, सुशीला गुंजाळ, कविता गुंजाळ, शांताबाई गुंजाळ, सोनाली गुंजाळ आदींसह शेतकरी उपस्थित होते.