रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांकडून रुग्णालयात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 01:33 AM2022-05-28T01:33:16+5:302022-05-28T01:33:38+5:30
टाकळी येथील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मयताच्या नातेवाईकांनी शुक्रवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास सुविचार रुग्णालयात दगडफेक करून तोडफोड करीत येथील परिचारिका व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.
नाशिक : टाकळी येथील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मयताच्या नातेवाईकांनी शुक्रवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास सुविचार रुग्णालयात दगडफेक करून तोडफोड करीत येथील परिचारिका व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.
पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि. २४) पहाटेच्या सुमारास टाकळी येथील विक्रम नथू गांगुर्डे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नातेवाईकांनी सुविचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांचा तत्काळ सीटीस्कॅन करण्यात आला. यात त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होत असल्याचे लक्षात आल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी नातेवाईकांना याची कल्पना दिली. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. यावेळी रुग्णालय प्रशासन व रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये काही प्रमाणात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केला. परंतु. रुग्णालयात रुग्णाला दाखल करताना डिपॉझिटची मागणी करण्यात आल्याचा राग मनात धरून मयत विक्रम नथू गांगुर्डे यांचा भाऊ प्रशांत नथू गांगुर्डे यांनी त्याच्या साथीदारांसह शुक्रवारी (दि.२७) पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास रुग्णालयात येत डिपॉझिट मागणाऱ्या कर्मचाऱ्याला व परिचारिकेला मारहाण केली. त्याचप्रमाणे दगडफेक करून रुग्णालयाच्या व रुग्णवाहिकेच्या काचा फोडून नुकसान केले. याप्रकरणी डॉ. अविनाश आंधळे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी संशयित प्रशांत नथू गांगुर्डे यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांनी दिली.