हॉटेलचालकांची वेटरला अपहरण करून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:38 AM2018-09-15T00:38:43+5:302018-09-15T00:38:58+5:30
एका हॉटेलच्या वेटरचे चौघा हॉटेलचालकांनीच पगाराच्या वादातून अपहरण करून त्याला गंगापूर रोडवरील हॉटेलमध्ये डांबून ठेवत त्याचा दात पाडल्याची घटना घडली आहे.
नाशिक : एका हॉटेलच्या वेटरचे चौघा हॉटेलचालकांनीच पगाराच्या वादातून अपहरण करून त्याला गंगापूर रोडवरील हॉटेलमध्ये डांबून ठेवत त्याचा दात पाडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित चौघांपैकी तिघांना अटक केली असून, एकाचा शोध सुरू आहे.
औरंगाबादरोड परिसरातील जनार्दन स्वामी आश्रमाजवळ तपोवन परिसरतील रहिवासी संजय एकनाथ पिठे (१८) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो गंगापूर रोडवरील पाहुणचार हॉटेल येथे वेटरचे काम करीत होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याचा पगार हॉटेल व्यवस्थापनाकडे अडकला होता. पगाराचे हे पैसे मागण्यासाठी तो हॉटेलचालकांकडे गेला होता; परंतु व्यवस्थापनाने त्याला पगार देण्यास टाळाटाळ केली. याच रागातून पाहुणचार हॉटेलचे संशयित प्रदीप निकम, अशोक निकम, विनोद व अन्य एक अशा चौघांनी गुरुवारी (दि. १३) दुपारी १२ वाजेच्या सुमारास संजय पिठेला औरंगाबाद नाक्यावरून एमएच ०४ एडब्ल्यू २८२९ या क्र मांकाच्या कारमध्ये बळजबरीने बसवून अपहरण करीत त्याला पाहुणचार हॉटेलमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर संशयितांनी वेटर पिठे याला मारहाण करीत संशयित अशोक निकम याने फटका मारल्याने त्याचा दात पाडला. या घटनेत वेटर पिठे हा जखमी झाला असून, त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरु द्ध आडगाव नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी तपास करून चौघांपैकी तिघांना अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भोंडवे करीत आहेत.