गॅस स्फोटातील हॉटेल कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 01:01 AM2021-10-04T01:01:56+5:302021-10-04T01:02:41+5:30
पाथर्डी शिवारातील खंडोबानगर परिसरात नव्याने सुरू झालेल्या हॉटेल रेडिसनच्या किचनमध्ये गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम चालू असताना रात्री साडेनऊच्या सुमारास गॅस स्फोट होऊन आठ कामगार भाजल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. या घटनेतील जखमी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
इंदिरानगर : पाथर्डी शिवारातील खंडोबानगर परिसरात नव्याने सुरू झालेल्या हॉटेल रेडिसनच्या किचनमध्ये गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम चालू असताना रात्री साडेनऊच्या सुमारास गॅस स्फोट होऊन आठ कामगार भाजल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. या घटनेतील जखमी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हॉटेलच्या किचनमध्ये स्फोट झाल्याचे सांगितले. गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम चालू असताना नायट्रोजन टेस्टिंग काम सुरू असताना स्फोट झाला होता. स्फोटाचा जोरदार आवाज होऊन धावपळ उडाली; मात्र या स्फोटात किचनमध्ये काम करणारे आठ कामगार जखमी झाले होते. इंदिरानगर पोलीस तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले व उपाययोजना करण्यात आली होती. जखमी झालेल्या कामगारांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या आठ कामगारांपैकी दिवाकर सुरेंद्र प्रसाद (२६, रा. जयपूर, आजमगड, उत्तर प्रदेश) हे २८ टक्के भाजले होते. शनिवारी (दि.२) दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास औषध उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.