हॉटेल कामगाराची डोक्यात दगड टाकून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:20 AM2021-09-10T04:20:19+5:302021-09-10T04:20:19+5:30
ऐन सणासुदीच्या तोंडावर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत स्ट्रीट क्राइमसह खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे एकापाठोपाठ घडू ...
ऐन सणासुदीच्या तोंडावर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत स्ट्रीट क्राइमसह खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे एकापाठोपाठ घडू लागल्याने कायदा-सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. बालाजी कोट परिसरात गुरुवारी मध्यरात्री सरकारवाडा पोलीस ठाण्याचे गस्ती पथक गस्तीदरम्यान बालाजी कोट मंदिर परिसरातून जात असताना रक्तबंबाळ मृतावस्थेत त्यांना एक पुरुष आढळला. सहायक उपनिरीक्षक राजेंद्र कदम तत्काळ घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. अवघ्या काही मिनिटांत सहायक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पंचवटीचे डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह गुन्हे शाखांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली अशा तीनही पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांनी तत्काळ या खुनामागील संशयितांच्या शोधासाठी तपासचक्रे फिरवून शहर व परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.
यावेळी भांडीबाजारातील हॉटेल राजहंसमधील कामगाराचा मृतदेह असल्याची माहिती समोर आल्यानंतर हॉटेलमालक रमेश निकम यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली असता अनिल गायधनी (५०) असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. दरम्यान, दोन तासांत पोलिसांनी या खून प्रकरणात संशयित शुभम महेश मोरे (२२, रा. सराफबाजार) यास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे ताब्यात घेतले असून, त्याचे काही साथीदारदेखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.