हॉटेल्सवरही जेसीबी चालविण्यात येऊन अतिक्रमित बांधकाम हटविण्यात आले
By admin | Published: January 7, 2015 01:07 AM2015-01-07T01:07:42+5:302015-01-07T01:14:37+5:30
हॉटेल्सवरही जेसीबी चालविण्यात येऊन अतिक्रमित बांधकाम हटविण्यात आले
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गंगापूररोडवर सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार मोहीम राबवत वाहनतळाच्या जागांमध्ये अतिक्रमण करणाऱ्या हॉटेल्स व्यावसायिकांना आपले लक्ष्य केले. यात उपमहापौरांच्या बंधूंच्या हॉटेलसह माजी नगरसेवक, माजी आमदार, आरटीओ अधिकारी यांच्या मालकीच्या जागांवरील हॉटेल्सवरही जेसीबी चालविण्यात येऊन अतिक्रमित बांधकाम हटविण्यात आले. पालिकेने केलेल्या या कारवाईत दिवसभरात २८ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सोमवारपासून गंगापूररोडवरील व्यावसायिकांची अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू केली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पालिकेने गंगापूररोडवरच मोहीम राबवत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे हटविली. अतिक्रमण निर्मूलन पथकाने सकाळी पहिल्यांदा पंडित कॉलनीतील श्री ज्योती बुक सेलर्सने वाहनतळाच्या जागेत उभारलेल्या पत्र्याच्या शेडवर जेसीबी चालवित अतिक्रमण जमीनदोस्त केले. पालिकेने श्री ज्योती बुक सेलर्सला सोमवारीसच सदर अतिक्रमण काढून टाकण्याची सूचना केली होती; परंतु अतिक्रमण न काढले गेल्याने पालिकेने आपले काम फत्ते केले. त्यामुळे बुक सेलर्समधील मालाचेही काही प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर पथकाने आपला मोर्चा जेहान सर्कलकडे वळविला. जेहान सर्कल ते आनंदवल्लीपर्यंत रस्त्यालगत असलेल्या हॉटेल्सची वाहनतळाच्या जागेतील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. त्यात प्रामुख्याने हॉटेल रेड चिली, हॉटेल मंगलम्, हॉटेल दुर्वांकुर, बॉबी रेस्टॉरंट, हॉटेल तंदूर फॅमिली, हॉटेल दिवट्या बुधल्या वाडा, गो-गोमंतक, हॉटेल काका का ढाबा या हॉटेल्सचा समावेश होता. पथकाने या सर्व हॉटेल्सने पार्किंगच्या जागेत केलेले पक्के बांधकाम, संरक्षक भिंती, पत्र्याचे शेड्स यावर जेसीबी चालवित ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यावेळी काही हॉटेल्सचालकांनी कारवाई थांबविण्यासाठी फोनाफोनी करून पाहिली; परंतु पथकाने त्यांना कुणालाही दाद दिली नाही. काही हॉटेल्सचालकांनी आपण स्वत:हून अतिक्रमण काढून घेतो अशा विनवण्या केल्या; परंतु पथकाने विनंत्या फेटाळत कारवाई पूर्ण केली. पथकाने हॉटेल्सबरोबरच गंगापूररोडवर रुंदीकरणात बाधित होणाऱ्या पोद्दार हाऊसची सीमेंटची पक्की कमानही जमीनदोस्त केली. तसेच आनंदवल्ली गावातील शॉपिंग सेंटरचे अतिक्रमित ओटे, पेट्रोलपंपाची भिंत, गॅरेज, दुर्गा गॅस अॅटोचे अतिक्रमित बांधकामही हटविले. सुमारे २८ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.