हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावने कोरोना आणला नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 07:24 PM2020-12-15T19:24:13+5:302020-12-16T00:50:06+5:30
मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात सध्या केवळ ३९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मालेगाव ग्रामीण व महापालिका क्षेत्रात १८४ रुग्णांवर कोरोनाचे उपचार केले जात आहेत. हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावने आता कोरोना नियंत्रणात आणला आहे.
स्थानिक प्रशासनाची मेहनत, उपाययोजना व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे मालेगाव शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या ८ एप्रिल रोजी कोरोनाचे ५ रुग्ण आढळून आले होते. यात दोघांचा मृत्यू झाला. दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ झाली. तब्बल ९९ जणांचा कोरोनाने बळी घेतला होता. त्यामुळे मालेगाव हॉटस्पॉट ठरले होते. १८५ प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले होते. प्रशासनाने कोरोनाबाबतचे गैरसमज दूर करून प्रशासनाप्रति विश्वास निर्माण केला. कोरोनाबाधित रुग्णांवर आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी पद्धतीने उपचार करण्यात आले. पॅरा मेडिकल स्टाप उपलब्ध करून देण्यात आला. बाहेरगावच्या तज्ज्ञ डॉक्टरांना बोलविण्यात आले होते. याचा परिणाम म्हणून मालेगाव शहरात सध्या केवळ ३९ रुग्ण आहेत. मसगा महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये २३ रुग्ण आहेत. यापैकी १५ रुग्ण मालेगावबाहेरील आहेत, तर सहारा कोविड सेंटरमध्ये १६ रुग्ण आहेत. यापैकी ५ बाहेरचे असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मालेगाव ग्रामीणमध्ये १२, तर महापालिका क्षेत्रात १७२ रुग्ण आहेत; मात्र त्यांना गंभीर स्वरूपाचे लक्षणे नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. दिवाळी काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. या गर्दीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. प्रशासनाने तशी तयारीदेखील केली होती; मात्र दिवाळी होऊन तब्बल महिना उलटला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने मालेगाववासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
दिनांक - कोरोनाबाधितांची संख्या
८ एप्रिल २०२० - ०५
८ मे २०२० - ४१७८
८ जून २०२० - ८५४
८ जुलै २०२० - ११०५
८ ऑगस्ट २०२० - १४९०
८ सप्टेंबर २०२० - ११३८
८ ऑक्टोबर २०२० - ४३४
८ नोव्हेंबर २०२० - १२६
८ डिसेंबर २०२० - १०१