हॉटस्पाॅट निफाड तालुका हळूहळू सावरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:15 AM2021-05-07T04:15:05+5:302021-05-07T04:15:05+5:30
निफाड तालुक्यात मागील महिन्यात कोरोना रुग्णांची दररोज किमान ३०० पेक्षा जास्त संख्या वाढत असल्याने नागरिकांसह प्रशासनाचा तो चिंतेचा ...
निफाड तालुक्यात मागील महिन्यात कोरोना रुग्णांची दररोज किमान ३०० पेक्षा जास्त संख्या वाढत असल्याने नागरिकांसह प्रशासनाचा तो चिंतेचा विषय बनला होता. तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे व गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी निफाड तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावोगावी त्याची अंमलबजावणी सुरू झाली. इतकेच नव्हे तर बाजार समित्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन काही दिवस शेतीमालाचे लिलाव बंद ठेवण्यात आल्याने कोरोनाला रोखण्यात काही अंशी यश आले. गावोगावी प्रतिबंध क्षेत्राकरिता एक पोलीस कर्मचारी व दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे गावकऱ्यांवर नियंत्रण मिळविणे सोपे गेले. आता तालुक्यातील बव्हंशी जनता मास्कसह फिरतांना दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांसह आप्त-स्वकीय यांचा बळी गेल्याने त्याचाही धसका नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
इन्फो
लिलाव बंदचा ‘पॉझिटिव्ह’ परिणाम
निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, निफाड, सायखेडा व विंचुर येथील बाजार आवारांवर दररोज कांदा व शेतीमालाचे लिलाव होतात. यामुळे देखील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येताच लासलगाव येथील बाजारपेठेत सलग दोन आठवडे तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीने एक सप्ताह लिलाव बंद ठेवले आहेत. तालुक्यातील कोरोना देखभाल केंद्र वाढण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरविल्याने रुग्णसंख्येत घट होण्यास मदत झाल्याची चर्चा सुरू आहे.
इन्फो
रुग्णसंख्येची आकडेवारी
२९ एप्रिल : २८८०
३० एप्रिल : २५५३
१ मे : २३२६
दि २ मे : २३५६
दि. ३ मे : २३८५
दि. ४ मे : १८४६
दि. ५ मे : २२८७