‘हॉटस्पॉट’ वडाळागाव ‘सील’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 10:14 PM2020-06-02T22:14:07+5:302020-06-03T00:17:51+5:30
नाशिक : वडाळागाव परिसरात १९मे रोजी पहिला कोरोनाग्रस्त ट्रकचालक रुग्ण आढळून आला होता. यानंतर सातत्याने वडाळागावात कोरोनाबाधित रुग्ण मिळून येऊ लागले. या बारा दिवसांत वडाळागावचा कोरोनाग्रस्तांचा आकडा २९ वर पोहोचला आहे. यामध्ये सुरुवातीला आढळून आलेले काही रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहे. वडाळागावात येणारे सर्व प्रमुख रस्ते आता महापालिका व पोलीस प्रशासनाने बॅरिकेड लावून बंद केले.
नाशिक : वडाळागाव परिसरात १९मे रोजी पहिला कोरोनाग्रस्त ट्रकचालक रुग्ण आढळून आला होता. यानंतर सातत्याने वडाळागावात कोरोनाबाधित रुग्ण मिळून येऊ लागले. या बारा दिवसांत वडाळागावचा कोरोनाग्रस्तांचा आकडा २९ वर पोहोचला आहे. यामध्ये सुरुवातीला आढळून आलेले काही रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहे. वडाळागावात येणारे सर्व प्रमुख रस्ते आता महापालिका व पोलीस प्रशासनाने बॅरिकेड लावून बंद केले.
वडाळागावातील गावठाणमध्येही कोरोनाबाधित रुग्ण झिनतनगर भागात रविवारी आढळून आला. वडाळ्यातील शंभरफुटी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सादिकनगर, महेबूबनगर, मुमताजनगर, साठेनगर या भागात मोठ्या संख्येने रुग्ण मिळून आले आहेत. मुमताजनगरमध्ये आठ, तर महेबूबनगरमध्ये नऊ रुग्ण अद्याप मिळून आले आहेत. वडाळागावातील कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी दुसरीकडे लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली गेल्याने लोकांची रेलचेल अधिक वाढलेली दिसून येत आहे. वडाळागावात १९ मेपासून कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आणि हळूहळू वडाळा हे शहराचे ‘हॉटस्पॉट’ बनू लागले, यामुळे मनपा प्रशासनाचीही झोप उडाली. वडाळागावात प्रवेश करतानाच मुख्य चौफुलीवरील व्हिनस सोसायटीत एकूण सात रुग्ण एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. वडाळागावातील रजा चौक, झिनतनगर या गावठाण भागासह वरील झोपडपट्टी भागातील नगरांच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढती आहे. कोरोनाचा आजार या भागात अधिक फैलू नये, यासाठी मनपा प्रशासनाकडून पोलिसांच्या मदतीने वडाळ्यात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे.
---------------------------
असा तोडला वडाळ्याचा संपर्क
वडाळागावातील वडाळा चौफुली येथील महारुद्र हनुमान मंदिरासमोरून मुख्य रस्ता बॅरिकेड लावून बंद करण्यात आला आहे. तसेच संत सावता माळी कॅनॉल रस्त्याला जोडणारे गणेशनगर, जय मल्हार कॉलन्यांचे उपरस्तेही बंद करण्यात येत आहे. तैबानगर व मदिनानगर या भागाला जोडणारे शंभर फुटी रस्त्यावरील उपरस्तेही नागरिकांनी बंद केले आहेत. इंदिरानगरकडून वडाळ्यात येणाऱ्या श्री.श्री.रविशंकर रस्त्यावरदेखील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बॅरिकेड लावण्यात येऊन एकेरी करण्यात आला आहे. सादिकनगर, मुमताजनगर, महेबूबनगरकडे जाणारे रस्तेही बंद केले गेले आहेत. या सर्व नगरांमध्ये जाण्यासाठी शंभरफुटी रस्ता ओलांडावा लागतो.