तासभर खोळंबा : वडाळारोड-गायकवाड सभागृहामागील रस्त्यावर कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 05:42 PM2018-10-30T17:42:51+5:302018-10-30T17:44:28+5:30
अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडल्यानंतरही एकाही सुशिक्षित वाहनचालकाला शहर वाहतूक नियंत्रण कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देणे आवश्यक वाटले नाही. याउलट वाहतूक कोंडीत अडकून हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करण्यामध्येच अनेकांना रस वाटला.
नाशिक : भाभानगरमधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये इंदिरानगर परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवारी (दि. ३०) दुपारी पार पडला. यावेळी अचानकपणे पालकांची गर्दी उसळल्याने सभागृहामागील मुंबईनाका-वडाळा रस्त्याला जोडणाऱ्या अरुंद रस्त्यावर तासभर वाहतूक कोंडी झाली.
मुंबईनाका-वडाळा रस्त्याला नंदिनी नदीकाठापासून जोडणारा अरुंद रस्ता गायकवाड सभागृहामागून जातो. या रस्त्याच्या एका बाजूला नदीचा काठ असून दुस-या बाजूला रहिवासी अपार्टमेंट आहे. अगदी पंधरा ते तीस फुटांचा हा रस्ता अंतर्गत रहदारीसाठी तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर दुपारी बारा वाजेच्या सुमारास अचानकपणे कार्यक्रम आटोपून विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी पालकांची गर्दी उसळली. यामुळे रस्त्यावर चारचाकी, दुचाकी वाहनांची कोंडी झाली. या रस्त्यावरून मुंबईनाका-वडाळारोडच्या दिशेने ये-जा करणारे वाहनचालक समोरासमोर आले होते. सभागृहाशेजारील वाहनतळातून अचानकपणे मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. विशेष म्हणजे सर्व पालक सुशिक्षित असूनदेखील वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर विनाकारण कर्णकर्कश हॉर्न वाजविण्यावर भर देताना दिसून आले. तसेच आपली लेन सोडून विरुद्ध बाजूच्या लेनवर जाण्याच्या प्रयत्नाने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली. यावरून वाहनचालकांचे वाहतूक नियमांविषयीचे अज्ञानही पहावयास मिळाले.
दरम्यान, सुमारे अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडल्यानंतरही एकाही सुशिक्षित वाहनचालकाला शहर वाहतूक नियंत्रण कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देणे आवश्यक वाटले नाही. याउलट वाहतूक कोंडीत अडकून हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करण्यामध्येच अनेकांना रस वाटला. यावेळी बेशिस्तपणाचा कळस वाहनचालकांकडून गाठला केला. काही पालकांनी या अरुंद रस्त्याच्या कडेलाच आपली चारचाकी उभी केल्याने रस्ता अधिक अरुंद बनला आणि सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली.
वडाळा रस्त्यावरही कोंडी
या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा ताण वडाळा-इंदिरानगर मुख्य रस्त्यावरही पडला. वाहनांच्या रांगा थेट वडाळा रस्त्यापर्यंत लागल्याने वडाळा रस्त्यावर भारतनगरपासून विनयनगरपर्यंत वाहतूक कोंडी झाली. तर दुसरीकडे हिरवेनगरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्याचे चित्र होते. एकूणच संपूर्ण वाहतूकव्यवस्थेचा या वाहनकोंडीमुळे फज्जा उडाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत ‘कुणाची म्हैस अन् कुणाला उठबैस’ अशा म्हणीद्वारे आपल्या उद्विग्न भावनांना वाट मोकळी करून दिली.