बोगदेवाडीत घराला लेकीच्या नावाची पाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:02 PM2020-01-11T23:02:56+5:302020-01-12T01:20:00+5:30
बोगदेवाडी (ठाकरवाडी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानातंर्गत करूया सन्मान लेकीचा उपक्रम राबविण्यात आला.
नांदूरशिंगोटे : येथील बोगदेवाडी (ठाकरवाडी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानातंर्गत करूया सन्मान लेकीचा उपक्रम राबविण्यात आला.
राज्य शासन व जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभागाकडून ३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत सर्व शाळांमध्ये ‘लेक वाचवा लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार परिपाठाच्या वेळेत वेगवेगळे उपक्रम राबवून जनजागृती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर येथील बोगदेवाडी शाळेत सदरचा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या आवारात ‘रांगोळी सडा व दाराला फुलांचे तोरण’ लावण्यात आले होते. वस्तीवर प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. प्रभातफेरीत मुलगी शिकली प्रगती झाली, बेटी बचावो-बेटी पढाओ, मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. ही प्रभातफेरी शाळेतील प्रत्येक मुलीच्या घरी नेण्यात आली. यावेळी विद्यार्थिनीनी कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा केल्या होत्या. मुलींच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देण्यात आल्या होत्या. पालकांनी मुलींचे गुलाबपुष्प देऊन व औक्षण करून उत्साहात स्वागत केले. या उपक्रमाला पालक समितीचे अध्यक्ष गंगाराम मेंगाळ, शिक्षक विनोद आडेप, मंगल वाघ आदींसह पालक संघाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.