नायब तहसीलदाराचे घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 01:33 AM2021-08-13T01:33:52+5:302021-08-13T01:34:53+5:30
तपोवनरोड बोधलेनगरमागे असलेल्या स्प्रिंगव्हॅली शिवसृष्टी सोसायटीत राहणारे कळवणचे नायब तहसीलदार यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील सुमारे पाच लाखांचे दागिने लुटून पोबारा केल्याची घटना घडली आहे.
नाशिकरोड : तपोवनरोड बोधलेनगरमागे असलेल्या स्प्रिंगव्हॅली शिवसृष्टी सोसायटीत राहणारे कळवणचे नायब तहसीलदार यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील सुमारे पाच लाखांचे दागिने लुटून पोबारा केल्याची घटना घडली आहे. महिनाभरापासून नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन मोठ्या घरफोड्या झाल्या असून, त्याचा उलगडा करण्यास अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही.
कळवणच्या नायब तहसीलदार शैलेजा विश्वजित भोईर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास त्या घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून कळवण येथे नोकरीनिमित्त रवाना झाल्या. त्या मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास नोकरीवरून नेहमीप्रमाणे घरी आले असता मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला आढळला. घरातील व कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले व लॉकर उघडे दिसून आले. चोरट्यांनी भोईर यांच्या घरातून सोन्याच्या पाच तोळ्याच्या बांगड्या, तीन तोळ्याचे सोन्याच्या पोतीचे मंगळसूत्र, दोन तोळ्याचा नेकलेस, दोन तोळ्याची सोन्याची नथ, एक तोळ्याचे लॉकेट, दीड तोळ्याचा सोन्याचा वेढा, कर्णफुले, चांदीच्या पैंजणाचे तीन जोड, डायमंड अंगठी, चांदीची नाणी असा एकूण चार लाख ७९ हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे.
--इन्फो--
श्वान पथकाला पाचारण
भोईर दांपत्याने उपनगर पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांसह जाऊन पाहणी केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरात उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन व नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशा तीन मोठ्या घरफोड्या झाल्या असून, त्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. वाढत्या घरफोड्यांमुळे रहिवाशी व व्यावसायिकांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.