घरपट्टीत वाढ, पाणीपट्टीत मात्र घट
By admin | Published: January 1, 2016 12:01 AM2016-01-01T00:01:50+5:302016-01-01T00:14:50+5:30
घरपट्टीत वाढ, पाणीपट्टीत मात्र घट
सिडको विभाग : २८५ थकबाकीदारांना जप्ती वॉरंटसिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी घरपट्टीत डिसेंबर अखेरपर्यंत सुमारे दीड कोटी रुपयांची वाढ झाली असून, पाणीपट्टीत मात्र सुमारे ९० लाखांची घट झाली आहे. दरम्यान, मुदत देऊनही थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर संक्रांतीनंतर मिळकत जप्तीची व जाहीर लिलावाची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले.
महापालिकेच्या सिडको घरपट्टी व पाणीपट्टी विभागाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षी एप्रिल ते डिसेंबर २०१४ या दरम्यान घरपट्टीची वसुली ही ९ कोटी ७५ लाख इतकी झाली होती. यंदाच्या वर्षी एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत घरपट्टीची वसुली ही ११ कोटी २५ लाख इतकी झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत घरपट्टीत सुमारे दीड कोटींची वाढ झाली आहे. तर याउलट पाणीपट्टीची परिस्थिती झाली आहे. मागील वर्षी एप्रिल ते डिसेंबर २०१४ या कालावधीत पाणीपट्टीची वसुली ही ४ कोटी ९९ लाख इतकी झाली होती. परंतु यंदाच्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर २०१५ या कालावधीत पाणीपट्टीची वसुली ही ४ कोटी ७ लाख इतकीच झाल्याने पाणीपट्टीत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ९२ लाखांची घट झाल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने ज्या घरपट्टीच्या थकबाकींदाराकडे पाच हजार रुपयांच्या वर थकबाकी आहे, अशा २८५ थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजाविण्यात आले आहे. तर इतर सुमारे पाच हजार ३०० थकबाकीदारांना सूचना पत्र देण्यात आले आहे. (वार्ताहर)