घरगुती ग्राहकांना बसणार दरवाढीचा ‘शॉक

By admin | Published: February 19, 2015 12:31 AM2015-02-19T00:31:20+5:302015-02-19T00:31:33+5:30

’महावितरणचा प्रस्ताव : एप्रिलपासून अंमलबजावणी शक्य

Household customers 'hike shock' | घरगुती ग्राहकांना बसणार दरवाढीचा ‘शॉक

घरगुती ग्राहकांना बसणार दरवाढीचा ‘शॉक

Next

नाशिक : महावितरण कंपनीने आर्थिक तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत पुन्हा एकदा दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. प्रस्तावित दरवाढीनुसार घरगुती ग्राहकांना सर्वाधिक फटका बसणार असून, त्यांच्या वीजबिलात १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महावितरणने सादर केलेल्या दरवाढीच्या प्रस्तावानुसार घरगुती वीजवापराचे प्रस्ताव बदलून ग्राहकांसाठी विविध श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ० ते ७५, ७६ ते १२५, १२६ ते ३०० युनिट वापरणाऱ्या वीजग्राहकांना स्वतंत्र श्रेणीत आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे ७६ ते १२५ युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या नव्या श्रेणीमुळे घरगुती ग्राहकांवर मोठी दरवाढ लादली जाणार आहे. ० ते ७५ युनिट वीज वापरणाऱ्यांना ४.१६ रु. प्रति युनिट याप्रमाणे दर आकारला जाणार आहे. तर ७६ ते १२५ युनिट वीज वापरणाऱ्यांना ५.५५ रु. प्रति युनिट इतका दर प्रस्तावित आहे. तर १२६ ते ३०० युनिटसाठी ७.१० रु. असा दर ठरविण्यात आला आहे.
महावितरणने यंदाच्या दरवाढीत घरगुती ग्राहकांवर दरवाढ लादल्यामुळे या दरवाढीस मोठा विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रस्तावित दरवाढ लागू करण्यापूर्वी राज्यभर वीज नियामक आयोग सुनावणी करणार असून, महावितरणच्या या प्रस्तावावर वाशी, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि नाशिक येथे जनसुनावणी होणार आहे.
दरम्यान, दरवाढीसंदर्भात केवळ तोट्याचे कारण दाखविल्यामुळे महावितरण अडचणीत येण्याची शक्यता आहे. यापूर्वी न्यायालयाने महावितरणला थकबाकीदारांकडील वसुली करण्याचे आदेशीत केले होते, मात्र थकबाकी वसुली न करताच तोट्याचे कारण दाखविण्यात आल्यामुळे प्रस्तावित दरवाढ काहीअंशी कमी करण्यासाठी ग्राहक मंडळे जनसुनावणीत बाजू मांडणार आहेत. या सर्व शहरांमध्ये जनसुनावणी झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल-मे मध्ये नवीन दरवाढीचा अंतिम मसुदा तयार होण्याची शक्यता आहे.
महावितरणने दाखल केलेल्या वीजदरवाढीच्या प्रस्तावात ८ ते १० टक्के वाढ सुचविली आहे. मात्र गेल्या वर्षभरात महावितरणने ग्राहकांवर अधिभार लादल्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात अगोदरच वाढ झालेली आहे. दरवाढीच्या प्रस्तावापूर्वी ग्राहकांकडून विविध शिर्षाखाली वसूल केलेल्या दराची वजावट होणार आहे का, असा प्रश्न आताच ग्राहक पंचायतीने उपस्थित केला आहे.
दरम्यान, दरवाढ प्रस्तावापूर्वीच मुंबईत झालेल्या सुनावणीत राज्यातील तमाम वीजग्राहक संघटनांनी या दरवाढीच विरोध करत वीजबिलात सुसूत्रता आणावी, वसूल करण्यात येणाऱ्या शिर्षाची स्पष्ट माहिती ग्राहकांना द्यावी, अशी बाजू मांडली होती. शिवाय अगोदर पूर्ण थकबाकी वसुली करावी त्यानंतरच दरवाढ सूचविण्यात यावी, असाही मुद्दा मांडला होता. मात्र वसुली न होताच महावितरणने प्रस्ताव पुढे रेटला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Household customers 'hike shock'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.