लक्ष्मीच्या मूर्ती घेण्यासाठी गृहिणींची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:38 AM2018-11-01T01:38:47+5:302018-11-01T01:39:03+5:30
दिवाळी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. बुधवारी (दि. ७) लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर महालक्ष्मी, केरसुणीचे पूजन घरोघरी केले जाते. यानिमित्त बाजारात महालक्ष्मीच्या मूर्ती मोठ्या संख्येने दाखल झाल्या आहेत.
नाशिक : दिवाळी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. बुधवारी (दि. ७) लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर महालक्ष्मी, केरसुणीचे पूजन घरोघरी केले जाते. यानिमित्त बाजारात महालक्ष्मीच्या मूर्ती मोठ्या संख्येने दाखल झाल्या आहेत. बाजारपेठेतदिवाळीची लगबग पहावयास मिळत असून, ठिकठिकाणी मातीच्या पणत्या, आकाशकंदील महालक्ष्मीच्या मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. मातीच्या आकाशकंदिलांची रचना आणि कलाकुसर नागरिकांना आकर्षित करीत आहेत. महालक्ष्मीच्या मूर्ती खरेदीसोबत मातीचे आकशकंदील खरेदीवरही नागरिक भर देताना दिसून येत आहेत. मातीच्या कंदिलांचेही दर वधारले आहेत. मातीच्या पणत्यांचे विविध आकर्षक प्रकार नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. शहरातील गंगापूररोड, कॅनडा कॉर्नर, शरणपूररोड, काठेगल्ली, द्वारका, उपनगर, सिडको आदी भागांमध्ये मोठ्या संख्येने महालक्ष्मी मूर्ती, मातीच्या पणत्या, आकाशकं दील विक्रेते दाखल झाले आहेत. दिवाळीच्या कालावधीत पणत्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दीपोत्सव अर्थात दिव्यांचा उत्सव असल्यामुळे नागरिक घरासमोर रांगोळी काढून त्यावर पणत्या प्रज्वलित करतात. तसेच उंबरठ्यापासून खिडक्या, बाल्कनीदेखील पणत्यांच्या प्रकाशात उजळून निघालेल्या असतात. त्यामुळे पणत्यांना अधिक मागणी असते. यासोबतच आकर्षक रंगकाम केलेले मातीचे आकाशकंदील बाजारात पहावयास मिळत आहे. पारंपरिक आकर्षक सजावटीवर नागरिकांकडून भर देत दिवाळी साजरी करण्यास प्राधान्य दिले जात आहे.