गृहउद्योगांना आता निवासी दरानेच घरपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:41+5:302021-01-20T04:15:41+5:30
दरम्यान, कश्यपी धरणासाठी जमिनी देणाऱ्या ३६ प्रकल्पग्रस्तांना मनपाच्या सेवेत घेण्याचा निर्णय पुन्हा एकदा स्थगित करण्यात आला आहे. शासनाकडे प्रलंबित ...
दरम्यान, कश्यपी धरणासाठी जमिनी देणाऱ्या ३६ प्रकल्पग्रस्तांना मनपाच्या सेवेत घेण्याचा निर्णय पुन्हा एकदा स्थगित करण्यात आला आहे. शासनाकडे प्रलंबित असलेला आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर त्या रिक्त जागा भरण्याच्या वेळी या प्रस्तावाचा विचार करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहे.
महापालिकेची महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.१९) पार पडली. यावेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. डॉक्टर, वकील, वास्तुविशारद, सीए यांच्यासह बौद्धिक व्यवसाय करणारे सर्व घटक निवासी मिळकतीत प्रॅक्टिस करीत असल्यास, त्यावर अनिवासी नव्हे, तर निवासी दराने घरपट्टी आकारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या कर विभागाने महासभेवर ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने व्ही.शशिधरण यांच्यासंदर्भात १९८४ मध्ये केलेल्या न्यायनिवाड्यात निवासी मिळकतीत बौद्धिक व्यवसाय करणारे वकील, डॉक्टर व तत्सम वर्गवारीतील व्यक्ती निवासी वापराच्या मिळकतीत प्रॅक्टिस करीत असतील, तर त्यांच्याकडून अनिवासीऐवजी निवासी दराने कर आकारणी करावी, असे म्हटले आहे, त्याचा आधार घेऊन केलेला प्रस्ताव महासभेत विनाचर्चा मंजूर झाला. मात्र, त्याच वेळी गृहउद्योगांना सवलत देण्याचा निर्णयही महापौरांनी घोषित केला. सध्या घरोघर अनेक प्रकारचे व्यवसाय केले जातात आणि कुटुंब प्रमुखाच्या चरितार्थाला हातभार लावला जातो. त्यांनाही लाभ मिळणार आहे.
दरम्यान, ३६ प्रकल्पग्रस्त महापालिकेच्या सेवेत घेण्यास पुन्हा एकदा बगल देण्यात आली. महापालिकेने जलसंपदा विभागाबरोबरच कश्यपी धरण बांधण्याचा प्रययत्न केला होता. मात्र, नंतर तो फसला आणि महापालिकेचे १९९२ मध्ये दिलेले पाच कोटी रुपये अजूनही जलसंपदा विभागाकडे पडून आहे. मात्र, त्यावेळी कश्यपी प्रकल्पग्रस्तांना महापालिकेत घेण्याचे ठरले, त्या आधारे यापूर्वी काहींना घेण्यात आले. आता पुन्हा ३६ प्रकल्पग्रस्तांना सेवेत घेण्याचा विषय हेाते. शिवसेनेचे चंद्रकांत खाडे यांनी त्याचे समर्थन केले. मात्र, याच पक्षाच्या सुदाम डेमसे यांनी पाथर्डी शिवारात खत प्रकल्पासाठी जागा देणाऱ्या पाथर्डीच्या प्रकल्पग्रस्तांनाही मनपा सेवेत घेण्याची मागणी केली. महापौरांनी आकृतीबंध मंजूर झाल्यावर त्या विषयावर निर्णय घेण्याचे जाहीर केले.
इन्फो...
शिक्षण समितीचे सदस्य घोषित
महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्यांची नावे महासभेत महापौर सतीश कुलकर्णी यांनी घोषीत केली. नऊ सदस्यांच्या या समितीत भाजपाच्या संगीता गायकवाड, शिवाजी गांगुर्डे, शाहीन मिर्झा, सरीता सोनवणे, हेमलता कांडेकर हे पाच सदस्य भाजपचे, ज्योती खोले, सुनील गोडसे किरण गामणे हे शिवसेनेचे तर राष्ट्रवादीच्या राजेंद्र महाले यांना संधी देण्यात आली आहे.