माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:17 AM2021-08-23T04:17:22+5:302021-08-23T04:17:22+5:30
नाशिक : दहावी, बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनावर जाहीर करण्यात आला. त्यात अनेक हुशार विद्यार्थ्यांना तुलनेत कमी, ...
नाशिक : दहावी, बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनावर जाहीर करण्यात आला. त्यात अनेक हुशार विद्यार्थ्यांना तुलनेत कमी, तर त्यांच्याच बरोबरीच्या अथवा त्यांच्यापेक्षा काही प्रमाणात कमी हुशार विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले. अशाप्रकारे अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी आता शिक्षक, अधिकारी यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत असल्याचे चित्र दिसून येत असून, कोरोना संकटात विद्यार्थ्यांचा संसर्गापासून बचाव झाल्याच्या रूपाने अंतर्गत मूल्यमापनाचे फायदे दिसून येत असले तरी विद्यार्थ्यांच्या मनात निकालाविषयी निर्माण झालेल्या साशंकतेच्या रूपाने या मूल्यांकन पद्धतीचे काही तोटेही आता समार येऊ लागले आहेत. मात्र, या निकालात बहूतांश विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले असल्याने अशा प्रकारच्या तक्रारी अल्प प्रमाणात असल्याचे शिक्षकांकडून सांगितले जात आहे.
---
एकूण विद्यार्थी
दहावी -९२,२२६
बारावी -६८,५१६
पास झालेले विद्यार्थी
दहावी - ९२,२१०
बारावी - ६८,२२३
--
परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही
- कोरोनामुळे दहावी, बारावीची परीक्षाच झाली नाही
अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुणदान करून निकाल जाहीर करण्यात आला.
- परीक्षाच झाली नाही. त्यामुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाची संधी मिळाली नाही.
परीक्षा न झाल्याने कमी गुण मिळाल्याची दाद कशी आणि कुठे मागणार हा प्रश्न विद्यार्थ्यी व पालकांसमोर निर्माण झाला आहे.
- साधारण गुणवत्तेचा विद्यार्थी मात्र त्याला चांगले गुण मिळाल्याने खूश आहे. परंतु, चांगले गुण मिळवूनही अकरावी प्रवेशासाठी कसरत करावी लागणार असल्याने हुशार विद्यार्थी मात्र चिंतित आहेत.
----
अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मिळालेले गुण अपेक्षित आहेत. परंतु, परीक्षा झाली असती तर आणखी काही
गुण वाढले असते असा माझा विश्वास आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाचा काहींना फायदा व काहींना तोटादेखील झाला आहे. मला दोन विषयात कमी गुण मिळाले आहेत. परीक्षा झाली असती तर नक्कीच जास्त गुण मिळविले असते.
-एक विद्यार्थिनी.
अंतर्गत मूल्यमापनाची पद्धत बोर्डाने ठरवून दिली होती. वास्तविक नववीचा विद्यार्थी दहावीत चांगला
अभ्यास करतो. त्यामुळे तो दहावीच्या लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवतो. परंतु, परीक्षा झाली नसल्याने विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करता आली नसल्याची मित्र-मैत्रिणींमध्ये चर्चा आहे.
-एक विद्यार्थी
----
कोरोना काळात संसर्गाचे संकट असल्यामुळे शाळा बंद होत्या, परीक्षाही झाल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाची पद्धत चांगली झाली. परंतु, लेखी परीक्षेपेक्षा अंतर्गत मूल्यमापनात पाल्याला कमी गुण मिळाल्याचे एका पालकाने सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग व शिक्षण मंडळाने वारंवार सूचना देऊन आणि पडताळणी करून शाळांकडून अंतर्गत मूल्यमापन करून घेतले. त्यामुळे त्यात पारदर्शकता असल्याचे मत काही पालकांकडून व्यक्त होत आहे. परंतु, सर्वच विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाल्याने अकरावीसाठी पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळविणे कठीण झाल्याचेही काही पालकांनी नमूद केले.