पंचवीस वर्षांत विकास झाला नाही त्याला तुकाराम मुंढे दोषी कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:56 AM2018-09-20T00:56:09+5:302018-09-20T00:56:25+5:30
महापालिकेत गरजेनुसार निधीच्या उपलब्धतेनुसार कामे करीत आहेत; मात्र पंचवीस वर्षांत गावठाण आणि अन्य भागांचा विकास झाला नाही त्यावेळी मी नसताना तुकाराम मुंढेच दोषी कसा? असा प्रश्न आयुक्तांनी महासभेत केला.
नाशिक : महापालिकेत गरजेनुसार निधीच्या उपलब्धतेनुसार कामे करीत आहेत; मात्र पंचवीस वर्षांत गावठाण आणि अन्य भागांचा विकास झाला नाही त्यावेळी मी नसताना तुकाराम मुंढेच दोषी कसा? असा प्रश्न आयुक्तांनी महासभेत केला. आपल्यावर दुषणे देणाऱ्यांना त्यांनी आपण सद्सद्विवेक बुद्धीनेच उत्तरे देत असल्याचे सांगितले. महापालिकेचे अंंदाजपत्रक १७०० कोटी रुपयांपर्यंत आणून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. रस्ते, पाणी, गटारी सुधारणा सर्वांना हवी आहे; परंतु त्यासंदर्भात निधी कोठून आणायचा ते मात्र नगरसेवक सांगत नाहीत. शहरात पाणी, पथदीप आणि ड्रेनेजची कामे सर्वप्रथम आवश्यक असून, त्यानंतर रस्त्यांचा क्रम लागतो. ज्या २५७ कोटी रुपयांचा सातत्याने उल्लेख केला जातो, त्या कामांसाठी अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद नसताना कामे कशी करायची? असा प्रश्न करून यातील जी कामे खरोखरंच आवश्यक आहेत, अशी कामे घेण्यात आली आहेत. मुळात रस्त्यांची प्राकलने तपासल्यानंतर त्यात पावसाळी गटार तसेच क्रॉस लाइनची कामे करण्याची कोणतीही सोय नाही अशावेळी त्यात सुधारणा करण्यात आली. शहरात आणखी रस्त्यांची गरज आहे; परंतु त्यासाठी निधी कोठून आणायचा, स्पील ओव्हर किती वाढवायचा याचे उत्तर कोणी देत नाहीत. उलट निधी कोठून आणायचा ते प्रशासनाने ठरवावे, असे सांगून प्रशासनाकडे जबाबदारी ढकलली जाते. कर, अनुदान किंवा कर्ज या तीन प्रकारांतूनच उत्पन्न वाढविले जाऊ शकते; मात्र उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले त्यालाही विरोध केला जातो, असे ते म्हणाले. नगरसेवक घरची कामे सांगत नाहीत या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अधिकारीदेखील घरची कामे करीत नाहीत, असे सांगितले. स्मार्ट सिटीत असतानाही गावठाणातील कामे होत नाहीत हा शाहू खैरे यांचा आरोप खोडून काढताना त्यांनी आपण स्मार्ट सिटीवर संचालक असल्याने ३२२ कोटी रुपयांची गावठाण विकासकामांसाठी निविदा काढल्या आहेत, हे आपल्याला माहिती नाही काय? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. रस्त्यांची ७० कोटी रुपयांची तरतूद असताना प्रत्यक्षात पावसाळी गटारी कामांमुळे हे बजेट ८५ कोटींवर गेले असल्याचे सांगून त्यांनी समतोल विकासाचा विचार केला तर तो प्रभागनिहाय होऊच शकत नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. आपण पूर्वग्रहदूषित ठेवून कामे केली असती तर रस्त्यांचा निधी वाढविला नसता असे सांगून त्यांनी आपल्यावर आरोप केले जातात आणि दुसरीकडे बोलूही दिले जात नाही, असेही ते म्हणाले.
आयुक्तांच्या भाषणाच्या वेळी घोषणा
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अनेक आरोप झाले, त्याला उत्तर देताना आयुक्तांनी आपण सद्सद्विवेक बुद्धीनेच कामे करीत असल्याची सुरुवात केल्यानंतर संतोष साळवे यांनी त्यांना आक्षेप घेऊन विषयापुरतेच बोला, असे सांगितले. मला बोलू द्या असे आयुक्तांनी सांगितल्यानंतर दिलीप दातीर यांनी त्यांच्या विधानाला आक्षेप घेतला. ते सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही महापौरांना आदेश देऊ द्या, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे वाद सुरू झाले. अशोक मुर्तडक यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र आयुक्तांची ही दादागिरी असल्याचा आरोप करीत घोषणाबाजी सुरू झाली. मुंढे हे भाजपा सदस्यांच्या टीकेला उत्तर देत असून, त्यात भाजपा आक्षेप घेत नाही तर तुम्ही कशाला आक्षेप घेतात असे मुर्तडक यांचे म्हणणे होते. अखेरीस अजय बोरस्ते यांनी शिवसेनेच्या सदस्यांना शांत केले. शिवाजी गांगुर्डे यांनी आयुक्तांशी बोलताना सदस्य काय बोलता त्यावर बोलू नका, फक्त विचारलेली माहिती द्या, असे सांगितले. त्यानंतर आयुक्तांनी थेट माहिती देणे सुरू केले आणि नंतर शेवटी टीकेला उत्तर दिले.