Chhagan Bhujbal : "देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं त्या दत्तू भोकनळ, कविता राऊत, अंजना ठमकेंना नोकरी द्या"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 02:17 PM2022-08-20T14:17:40+5:302022-08-20T14:35:12+5:30
Chhagan Bhujbal : "सरकारी, निम सरकारी नोकरी देताना ऑलम्पिक संघाची मान्यता लागते. याचा तात्पुरता भावनिक विचार करून चालणार नाही, त्याने गोविदांची देखील फसवणूक केल्यासारखे होईल."
मुंबई - शिंदे-फडणवीस सरकारने दहीहंडीचा अधिकृतरीत्या खेळात समावेश केला असून, गोविंदांना आता क्रीडा कोट्यातील ५ टक्के शासकीय नोकरीत आरक्षणचा लाभही मिळणार असल्याचं सांगितलं. या निर्णयानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवत सरकारला सोशल मीडियात ट्रोल केलं. यानंतर अनेकांनी देखील यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. यावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "गोविंदांना नोकरीत आरक्षण नेमकं कसं देणार? काय निकष लावणार?" असा सवाल विचारला आहे.
"सरकारी, निम सरकारी नोकरी देताना ऑलम्पिक संघाची मान्यता लागते. याचा तात्पुरता भावनिक विचार करून चालणार नाही, त्याने गोविंदांची देखील फसवणूक केल्यासारखे होईल. आरक्षण असतानाही आंतरराष्ट्रीय खेळाडूंना अद्याप सरकारी नोकरी नाही. ज्यांनी देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं, त्या दत्तू भोकनळ, कविता राऊत, अंजना ठमके यांना नोकरी द्या. पण त्यांना अद्याप नोकरी नाही. गोविंदांना ५ टक्के आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र आहे त्यांना आधी न्याय द्या" असं म्हणत भुजबळ यांनी निशाणा साधला आहे.
"शरद पवार अब्दुल सत्तार यांना भोंग्यांचे मार्गदर्शन करणार नाही, शरद पवार सत्तार यांना पीक पाणी, पीक विमा, पद्धती याबाबत नक्की मार्गदर्शन करतील" असंही म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांना लवकर मदतीसाठी केवळ कृषीच नाही, तर सर्व विभागांनी एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे. संकट खूप मोठं, ओला दुष्काळ जाहीर करा. केवळ विरोधी पक्षांनी मागणी केली म्हणून नकार देण्याचं काहीही कारण नाही" असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यावर बोलताना "नवीन युवक, नवीन नेते राज्यात फिरत असतील, तर चांगली गोष्ट शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना यांच्यात पोस्टर काळे फासणे, फाडणे या गोष्टी सुरू राहतील. खरा कौल निवडणुकीत जनता देईल" असं सांगितलं. तसेच मुंबईला हल्ल्याची धमकी मिळाली आहे याबाबत सतर्कता बाळगावी लागेल अशा धमक्या येतात तेव्हा त्याचं विश्लेषण दिल्लीपासून मुंबई आणि पोलिसांच्या वेगवेगळ्या यंत्रणा करत असतात असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.