रस्ता काँक्रि टीकरण कामाचा कालावधी किती?
By Admin | Published: November 5, 2014 12:28 AM2014-11-05T00:28:02+5:302014-11-05T00:28:16+5:30
रविवार पेठतील व्यापाऱ्यांचा सवाल : काँक्रिटीकरणाबरोबरच अतिक्रमणेही काढणार का?; एक कोटी दहा लाखांचे काम
नाशिक : सुमारे एक कोटी दहा लाख रुपये खर्च करून महापालिका अशोकस्तंभ ते रविवार कारंजा या रस्त्याचे सीमेंट काँक्रिटीकरण करते आहे़ या कामास रविवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली असून, हे काम नक्की किती महिन्यांत पूर्ण होईल याबाबत व्यापारी साशंक आहेत़ या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात येणार नसतील तर लेव्हलिंग करून डांबरीकरण करण्यास काय हरकत होती, असा सवालही काही व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे़
‘सरकारी काम अन् बारा महिने थांब’ अशी म्हण जरी प्रचलित असली, तरी महापालिकेचे काम अन् बारा वर्षे थांब यानुसार रविवार पेठवासीयांनी सुमारे एक तपाची प्रतीक्षा केल्यानंतर हा रस्ता सीमेंट काँक्रीटचा होतोय; मात्र केवळ काँक्रिटीकरण न करता यावरील अतिक्रमणे काढून याची रुंदी वाढवावी, अशी मागणी काही व्यावसायिकांकडून केली जाते आहे़
मनपाने काही महिन्यांपूर्वी रामवाडी पूल ते मखमलाबाद नाका या रस्त्याचे तसेच रविवार पेठेतील अंतर्गत गल्ल्यांमधील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले; मात्र या कामास निर्धारित कालावधीपेक्षा कितीतरी अधिक कालावधी लागला़ त्यामुळे काँक्रिटीकरणाऐवजी रस्त्याचे लेव्हलिंग करून डांबरीकरण केले असते तरी चालले असते, अशी भूमिकाही काही व्यापाऱ्यांनी मांडली आहे़
या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामास महापालिकेने नेहमीसारखी दिरंगाई केल्यास तसेच सहा महिने दुकाने बंद राहिल्यास रविवार पेठेतील व्यावसायिकांचे व्यवसायच उद्ध्वस्त होतील, अशी भीती व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे़ तसेच या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना जर दुसऱ्या व्यावसायिकांकडे जाण्याची सवय लागल्यास ते पुन्हा या ठिकाणी येतील का, अशी चिंताही सतावतेय़
मनपाने रस्ता काँक्रिटी-करणाच्या कामाची गती वाढवून (दिवस-रात्र) शक्य होईल तितक्या कमी कालावधीत करून देण्याची मागणी येथील व्यावसायिक करीत असून, याबाबतचे निवेदनही ते मनपा आयुक्त व महापौर यांना देणार आहेत़ तसेच रविवार पेठेत येणाऱ्या ग्राहकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याची विनंतीदेखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)