राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार इतके कसे मागे पडलेत?
By किरण अग्रवाल | Published: May 26, 2019 01:18 AM2019-05-26T01:18:39+5:302019-05-26T01:22:57+5:30
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या व भुजबळ यांचे प्रभाव क्षेत्र म्हणवणाºया नाशिक जिल्ह्यात राष्टÑवादीचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झालेत, कारण या नेत्यांना आपल्या भोवतालचे तोंडदेखले नेते ओळखता आले नाहीत. अनेकजण सोबत असूनही नसल्या-सारखे व नाशकात प्रारंभा-पासूनच पराभूत मानसिकतेने वावरत होते, त्यामुळे विजयाचे सोडा; त्या समीप जाणेही मुश्कील ठरले.
सारांश
राजकारणात अपरिवर्तनीय काहीच नसते. त्यामुळे प्रत्येकवेळी इतिहासाची पुनरावृत्ती घडून न येता, त्याची पाने नव्याने लिहिली जातात. नाशिक जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे याचदृष्टीने बघता यावे, कारण हा निकाल नवा इतिहास घडवणारा तर आहेच; शिवाय राजकीय मातब्बरीच्या इतिहासाचे नव्या समीकरणांच्या संदर्भाने पुनरावलोकन करण्यास भाग पाडणाराही आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात तब्बल ४८ वर्षांपासून खासदार ‘रिपीट’ न होण्याचा इतिहास असला, तरी शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी तो मोडून काढला आहे, तर दिंडोरीतून विजयी झालेल्या भाजपच्या डॉ. भारती पवार या जिल्ह्यातील पहिल्याच महिला खासदार असल्याने वर्तमानातल्या या दोन्ही बाबी नवा इतिहास लिहायला लावणाºया ठरल्या आहेत. इतिहासाच्या पुनरावलोकनाबाबत म्हणायचे, तर ते या दोघांकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसंदर्भाने करता यावे. कारण, गोडसे व डॉ. पवार यांच्या विजयाची कारणमीमांसा करताना आपसूकच राष्ट्रवादीच्या पराभवाची कारणे उलगडली गेल्याखेरीज राहात नाहीत.
नाशिक जिल्ह्यातील राजकीय प्रभाव तसा वेळोवेळी बदलत गेला आहे. काँग्रेस पक्षापासून ते शिवसेना-भाजप ‘युती’पर्यंत आणि नाशिक शहरात गेल्या पंचवार्षिक काळापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही प्रभाव राहिल्याचे दिसून आले आहे. यात नेहमी जो उल्लेखिला जातो व ज्याची ऐतिहासिकता वारंवार चर्चिली जाते, तो ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा प्रभाव. ‘पुलोद’ प्रयोगाच्या वेळी नाशिक जिल्ह्याने सर्वच्या सर्व आमदार निवडून देऊन पवार यांचे हात बळकट केले होते. त्यामुळे साहेबांवर प्रेम करणारा जिल्हा म्हणूनही नाशिककडे पाहिले जाते. कालौघात राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले, हा भाग वेगळा; परंतु पवार यांना मानणारा मोठा वर्ग आजही जिल्ह्यात आहे हे नि:संशय. त्यामुळे ते जेव्हा केव्हा काहीही निमित्ताने नाशिक दौºयावर येतात, तेव्हा अन्य कोणत्याही राजकीय नेत्यांपेक्षा अधिक गर्दी त्यांच्या अवती-भवती दिसून येते. पण हल्ली सोबत वा समोर दिसणारी गर्दी मतपेटीत उतरेलच याची शाश्वती देता येत नाही. याच अनुभवाने पवारांना मानणाºया जिल्ह्यातील दोन्ही जागांवर त्यांनी विश्वासाने दिलेले दोन्ही उमेदवार केवळ पराभूतच होत नाहीत, तर तब्बल सुमारे २/३ लाखांच्या फरकाने मागे पडतात म्हटल्यावर साहेबांच्याच प्रभावाचे पुनरावलोकन केले जाणे अप्रस्तुत ठरू नये.
देशात मोदींची त्सुनामी होती त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील निकालाकडे अपवाद म्हणून बघता येऊ नये हे खरेच; पण जय-पराजयातील मतांचा फरक इतका मोठा असावा? केवळ त्सुनामीकडे बोट करून या निकालाचा अन्वयार्थ काढता येऊ नये हे म्हणूनच महत्त्वाचे. व्यक्तिगत लाभाच्या अपेक्षेने संबंध जपणारे, सहकारी संस्था -कारखाने व मार्केट कमिट्या राखणारे व बेगडी पक्षकार्य प्रदर्शित करून केवळ सभा-संमेलनांमधील व्यासपीठ उबवणारे नेते पवारांसारख्या मुरब्बी, मातब्बरासही ओळखता येऊ नयेत? पवार आल्यावर त्यांच्या मागेपुढे घोटाळणाºया राष्ट्रवादीच्या किती स्थानिक नेत्यांनी समीर भुजबळ व धनराज महाले या दोघांच्याही प्रचारात प्रामाणिकपणे झोकून दिले होते, हा शंकेचा प्रश्न ठरावा तो त्यामुळेच. राष्ट्रवादीचेच नेते ‘मनापासून’ सोबत नाही म्हटल्यावर, मुळात यथातथाच संघटनात्मक अवस्था असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना दूषण देता येऊ नये. कारण, ते तसेही पक्षात व जनमानसात अदखलपात्रतेच्या संवर्गात मोडले गेलेले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, पवार यांच्याप्रमाणेच छगन भुजबळ यांच्या मातब्बरीचाही यानिमित्ताने पुन्हा कस लागला. भुजबळ यांनादेखील ‘सोबत असूनही सोबत नसलेल्यांचा’ ठाव घेता आला नाही असेच म्हणता यावे. अन्यथा, संशयाने बघितल्या गेलेल्या पुतण्या समीरच्या उमेदवारीनंतर ते राज्यभर प्रचारात फिरण्याऐवजी प्रारंभापासून नाशकातच तळ ठोकून राहिलेले दिसले असते. ‘नाशिककरांनी माझी हौस फेडली’ असे म्हणूनही त्यांनी समीरला निवडणुकीत उतरवले ते काही आडाखे बांधूनच. यात भाजपा बंडखोर माणिकराव कोकाटे यांच्यामुळे मतविभाजन घडून आले नसते तर मतांचा फरक आणखी वाढला असता. कारण कोकाटेंना मताधिक्य मिळालेल्या सिन्नर तालुक्यातही शिवसेनेचे प्राबल्य असल्याने गोडसेंनाच लीड मिळाला असता. तिकडे भुजबळ पिता-पुत्राच्या विधानसभा मतदारसंघात येवला-नांदगावमध्येही भाजप उमेदवारास मताधिक्य लाभले. यातून घेता येणारा संकेत कुणासही न समजता येण्याइतका अवघड नाही.