मराठवाडा आत्ताच कसा भकास दिसू लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:07 AM2020-02-01T00:07:55+5:302020-02-01T00:08:12+5:30
नाशिक : राज्यात भाजप सरकार असताना मराठवाड्यातील प्रश्न दिसले नाही, ते प्रश्न आताच कसे उपस्थित झाले, असा सवाल करीत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्या काम करण्याच्या कार्यपद्धतीत फरक असल्याचेदेखील ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचाही त्यांनी समाचार घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये गुरुवारी (दि.३०) सुरू असलेल्या विभागीय आढावा बैठकीसाठी आलेल्या सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. पंकजा मुंडे यांनी नुकत्याच केलेल्या मराठवाड्याच्या उपोषणाविषयी बोलताना सत्तार यांनी पंकजा मुंडे यांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सत्तेत असताना त्या काम करू शकल्या नाही, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि तेदेखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. सत्ता गेल्यानंतर एकच महिन्यात त्यांना मराठवाडा हा भकास का दिसू लागला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यापूर्वी मराठवाडा सुजलाम्-सुफलाम् होता का असा प्रश्न उपस्थित करून मुंडे यांचे आंदोलन ही केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोप सत्तार यांनी केला. गोपीनाथ मुंडे यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती मात्र पंकजा मुंडे यांच्यामध्ये ते गुण दिसत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. अबू आझमी यांच्या मुलाने केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना सत्तार म्हणाले, अबू आझमी यांचा मुलगा जर आमच्या सोबत येऊन मशीद बांधण्याची गोष्ट करत असेल तर निश्चितपणे त्यांनी आमच्या सोबत यावे, आम्ही त्यांचे स्वागत करतो.जितेंद्र आव्हाड यांनी आणीबाणीसंदर्भात स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याविषयी सतार यांनी कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्याविषयी बोलताना तारतम्य ठेवले पाहिजे, असे सांगून सत्तार यांनी त्यांचा समाचार घेतला. आव्हाड यांना काय सल्ला देणार या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना सत्तार यांनी आव्हाड यांनी शिर्डीला जावे तसेच श्रद्धेबरोबरच सबुरीचा सल्ला दिला.