४८ तासांच्या कर्तव्यानंतर शाळेत कसे पोहोचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:22 AM2019-04-29T00:22:44+5:302019-04-29T00:24:37+5:30
जिल्ह्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोमवारी (दि.२९) मतदान होत असून, या निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषद व नाशिक महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांची निवडणूक कर्मचारी म्हणून मोठ्या प्रमाणात नेमणूक केली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोमवारी (दि.२९) मतदान होत असून, या निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषद व नाशिक महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांची निवडणूक कर्मचारी म्हणून मोठ्या प्रमाणात नेमणूक केली आहे.
या सर्व शिक्षकांना मतदानाच्या दुसºया दिवशी शाळेत हजर रहावे लागणार आहे. त्यामुळे जवळपास ४८ तासांच्या अविरत कर्तव्यानंतर शाळेत कसे पोहोचणार, असा सवाल उपस्थित करीत शिक्षकांना निवडणुकीच्या दुसºया दिवशी सुटी मिळावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी केली होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या मागणीला कोणताही प्रतिसाद दिला नसून निवडणुकीच्या जबाबदारीवर असलेल्या सर्व शिक्षकांना मंगळवारी शाळेत उपस्थित रहावे लागणार आहे.
निवडणूक आयोगाच्या धोरणाप्रमाणे बºयाचशा कर्मचाऱ्यांची नेमणूक त्यांच्या मुख्यालयापासूनच्या दूर असलेल्या तालुक्यांत करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदानप्रक्रिया सोमवारी (दि.२९) आहे. परंतु सर्व कर्मचाºयांना नियमाप्रमाणे निवडणुकीच्या एक दिवस अगोदर म्हणजे रविवारी (दि.२८) सकाळी ८ वाजेच्या आत नियुक्त तालुक्याच्या स्थळी पोहोचण्यासाठी रवाना व्हावे लागणार आहे. दुसºया दिवशी मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर तालुका स्तरावर साहित्य जमा केल्यानंतर कर्मचारी तेथेच मुक्काम करतील किंवा काही कर्मचारी घरी जाण्यासाठी रवाना होतील. इतक्या उशिरा घरी जाण्यासाठी बस, गाडी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असते. कितीही प्रयत्न केला तरी कर्मचारी मंगळवारी (दि.३०) पहाटे किंवा सकाळी त्यांच्या मुख्यालयी लवकर पोहचू शकत नाही. सध्याच्या स्थितीत जिल्हा परिषद शाळांची वेळ सकाळी ७.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत अशी आहे. या परिस्थितीत शिक्षक सलग ४८ तासांच्या कर्तव्यावरून परतून पुन्हा सकाळी ७ वाजता शाळेवर जाणे शक्य नाही.
प्रशासनाकडून प्रतिसाद नाही
निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त सर्व शिक्षकांना मंगळवारी (दि.३०) कामावर अनुपस्थित राहण्याची परवानगी अर्थात रजा मंजूर करण्यात यावी व त्यासंबंधीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात यावे, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी केली होती. मात्र शिक्षकांच्या मागणीला प्रशासनाकडून रविवारी सायंकाळपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शिक्षकांना निवडणुकीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा नियमितपणे आपल्या शाळेत उपस्थित रहावे लागणार आहे.