...मग दहा हजारात भागणार कसे?

By admin | Published: June 22, 2017 12:01 AM2017-06-22T00:01:53+5:302017-06-22T00:07:06+5:30

एक एकर शेतीसाठी जर खर्चच पंधरा हजारांच्या आसपास येणार असेल तर शासन देऊ पहात असलेल्या दहा हजाराच्या अग्रीम पीक कर्जातून खरिपाची पेरणी कशी करायची, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.

... how to run in ten thousand? | ...मग दहा हजारात भागणार कसे?

...मग दहा हजारात भागणार कसे?

Next

श्याम बागुल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सोयाबीन बियाणाची एक गोणी ४५०० रुपये, पेरणीसाठी ट्रॅक्टरचा खर्च दोन हजार, खताच्या दोन गोण्यांसाठी तीन हजार रुपये, मशागतीचा खर्च वेगळा तर बांधणी व मजुरीचा तर खर्चच मांडायला नको, अशाप्रकारे एक एकर शेतीसाठी जर खर्चच पंधरा हजारांच्या आसपास येणार असेल तर शासन देऊ पहात असलेल्या दहा हजाराच्या अग्रीम पीक कर्जातून खरिपाची पेरणी कशी करायची, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत. सात महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे जिल्हा बॅँकेत जमा-पुंजी अडकून पडलेली असताना ती मिळण्याची शाश्वती नाही, शासन देत असलेली मदत हातात पडल्याशिवाय खरी मानता येत नाही, अशी परिस्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची असून, या साऱ्या गोष्टींचा परिणाम खरिपाच्या पेरण्यांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज पाहता, यंदाही सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता व्यक्ती केली जात असल्यामुळे कृषी खात्याने यंदा नाशिक जिल्ह्यात खरिपाच्या ६८६०८० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. नाशिक जिल्हा खरीप पिकांचा असून, त्यात प्रामुख्याने सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद या तृणधान्याची पिके घेतली जातात. परंतु त्यातही मका व सोयाबीनचे होणारे उत्पादन व त्याला मिळणारा दर पाहता, गेल्या काही वर्षांत या दोन्ही पिकांच्या लागवड क्षेत्रातही कमालीची वाढ झाली आहे. पावसाने मान्सूनपूर्व चांगलीच हजेरी लावली, तर जूनमध्येच सरासरी ७० टक्के पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले असले तरी, त्यांच्यापुढे सर्वात मोठे आर्थिक संकट आहे.
साधारणत: शेतकऱ्याकडे दीड ते दोन हेक्टर इतकी जमीन आहे. एका एकरवर पेरणीसाठी बारा ते पंधरा हजार रुपये इतका खर्च असताना नोटाबंदीनंतर पेरणीसाठी पैसे उभे करणे शेतकऱ्यांना अवघड वाटू लागले आहे. राज्य सरकारची कर्जमुक्ती नियम, निकषात अडकून पडली असून, शेतकरी सुकाणू समिती व सरकार यांच्यात एकवाक्यता होत नसल्याने त्याबाबतची घोषणा लांबणीवर पडली आहे. परंतु हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शासनाने शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पीक कर्जासाठी अग्रीम देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
शेतकऱ्यांच्या मते राज्य सरकारने देऊ केलेली पीक कर्जाची मदत काहीच उपयोगी पडणार नाही. मुळात बी-बियाण्यांचे भाव हंगामाच्या तोंडावर वाढले असून, खतेही महागली आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्याकडे दीड ते दोन हेक्टर शेतजमीन आहे, त्या शेतकऱ्याचा पेरणीचा खर्चच एकरी बारा ते पंधरा हजार रुपये इतका आहे. त्याचे एकूण पेरणी क्षेत्राचा म्हणजेच पाच एकराचा विचार करता त्याला किमान ५० हजार रुपयांची तातडीची गरज आहे. त्यामुळे शासनाकडून देऊ करण्यात आलेल्या दहा हजार रुपये कोठे पुरणार, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत. पावसाची चाहूल लागल्याने शेतकऱ्याने तत्पूर्वीच शेत पेरणी योग्य करून ठेवले आहे, खते व बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. सरकारने अग्रीम पीककर्ज देण्याची घोषणा केली असली तरी, बॅँकांनी काखा वर केल्या आहेत.
पैसे मिळण्याची कोणतीही शाश्वती सध्या तरी दिसत नाही. नाशिक जिल्हा बॅँकेत खडखडाट झाला आहे. शासनाच्या हमीवर पीककर्ज देण्यास अन्य राष्ट्रीयीकृत बॅँका नाखूष आहेत, अशा परिस्थितीत पेरणीपूर्व खते, बियाणे शेतकरी घेऊ शकले तरच खरिपाची लागवड होणार आहे, अन्यथा अस्मानीपेक्षा सुलतानी संकटच यंदा खरिपाची ‘वाट’ लावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता
कांद्याचे कोसळलेले भाव, तूर खरेदीसाठी करावी लागणारी प्रतीक्षा, मध्यंतरी शेतकरी संपामुळे भाजीपाल्याचे झालेले नुकसान, पाल्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी करावी लागणारी जमवाजमव व सरकारचे धरसोडीचे धोरण पाहता यंदा खरिपाच्या पेरणीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्याच्या हातात सध्या पैसे नाहीत, त्याच्याकडील पुंजी बॅँकांमध्ये अडकून पडली असून, बॅँकेतून मागणीनुसार पैसेही मिळत नाहीत, अशा परिस्थितीत खरिपाची पेरणी करण्यासाठी रोख रकमेची गरज आहे. पेरणी, मशागतीसाठी मजुरांना दररोज मजुरीची रक्कम अदा करावी लागते तर यंत्राचेही भाडे त्याचदिवशी चुकते करावे लागत असल्याने शेतकऱ्यांपुढे खरिपाचे संकट उभे ठाकले आहे. तज्ज्ञांच्या मते शेतकऱ्यांना पुन्हा एकवार सावकाराचे पाय धरावे लागतील किंवा पेरणीवर पाणी फेरावे लागणार आहे.
असा आहे एकरी खर्च
सोयाबीन पिकासाठी
बियाणे एक गोणी- ४२०० ते ४५०० रुपये (३० किलो)
खताची गोणी- ३००० रुपये (दोन गोण्या) (५० किलो)
पेरणीसाठी ट्रॅक्टरभाडे- १८०० ते २००० रुपये
शेत तयार ट्रॅक्टर भाडे- २००० रुपये
मका पिकासाठी
बियाणे दोन गोण्या- २००० रुपये
शेत तयार करणे ट्रॅक्टर भाडे- १५०० ते २००० रुपये
पेरणी करण्यासाठी मजुरी- १२०० ते १५०० रुपये
खताची गोणी- ४००० रुपये (३ गोण्या)
शेणखत खरेदी- २५०० ते ३००० रुपये

Web Title: ... how to run in ten thousand?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.