कसा वाढेल तंत्रज्ञानाचा वापर?
By admin | Published: May 11, 2017 01:50 AM2017-05-11T01:50:35+5:302017-05-11T01:50:43+5:30
नाशिक : आॅनलाइन व्यवहाराला चालना देण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या आॅनलाइनचा वापर करणाऱ्या सर्वसामान्यांना हे तंत्रज्ञानच पुरेसे प्रभावी झाले नसल्याचा अनुभव येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आॅनलाइन व्यवहारामंध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत असली आणि सदर व्यवहाराला चालना देण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात अॅप, आॅनलाइनचा वापर करणाऱ्या सर्वसामान्यांना हे तंत्रज्ञानच अद्याप पुरेसे प्रभावी झाले नसल्याचा अनुभव येत आहे. डिजिटल इंडिया संकल्पनेनंतर सर्वत्र तंत्रज्ञानावर आधारित व्यवहार होतील असे बोलले जात असताना प्रत्यक्षात तंत्रज्ञानातील फोलपणा समोर आला आहे. इतकेच नव्हे तर देशात जे गाव अगोदर कॅशलेस झाले ते वसईतील गावदेखील तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे आता रोख व्यवहार करू लागले आहे.
जागतिकीकरणाच्या बरोबरीने चालण्यासाठी तंत्रज्ञानाचे स्वप्न दाखविण्यात आले मात्र यासाठी तयार करण्यात आलेल्या विविध खात्यांचे अॅपच कुचकामी ठरू लागले आहे. भीम अॅपसारखे एखादे अॅप डाउनलोड करायचे झाल्यास अॅँड्रॉइड फोनवर सपोर्ट मिळत नाही इतक्या प्राथमिक बाबींवर तंत्रज्ञान फोल ठरत आहे. एखाद्या अॅपवर सरकारी यंत्रणेकडे तक्रार केली तर ती समस्या न सुटताही निराकरण करून ती तक्रार निकाली काढली जाते किंवा अनेकदा आॅनलाइन माहिती भरायची तर सर्व्हर डाउन असल्याने किंवा साइट हॅँग असल्याने दिवस दिवस वाया जातो, अशा असंख्य तक्रारी आहेत.
विशेषत: शासकीय यंत्रणांकडून या साधनांचा प्रभावी प्रतिसाद नाही, त्यातच तांत्रिक दोष यामुळे अशामुळे तांत्रिकता सोपी वाटण्यापेक्षा डोकेदुखी ठरावी अशाप्रकारचे अनुभव येत असतात. नागरिकांना आलेल्या अनुभवांची ही प्रातिनिधिक स्वरूपातील मांडणी खास राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या निमित्ताने...ईपीएफओत
कळेना भवितव्य...
भाविष्य निर्वाह निधी विभागाशी प्रत्येक सरकारी आणि खासगी नोकरदारांचा संबंध येतो. केंद्र सरकारच्या या विभागाने नागरिकांना घरबसल्या विशेषत: मोबाइलवर माहिती मिळावी यासाठी ईपीएफओ हे अॅप तयार केले आहे. सदरचे अॅप डाऊनलोड सहज होते, परंतु त्यावर माहिती भरल्यानंतर ती सबमिट करताना मात्र चेक नेट कनेक्टीव्हीटी असाच संदेश येतो. त्यामुळे भविष्यासाठी असलेल्या निधीची सध्या काय स्थिती आहे, त्याची माहिती मात्र कळू शकत नाही.