वीस टक्के ऑक्सिजनने उद्योग कसे सुरू करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:52+5:302021-06-06T04:11:52+5:30
अंबड औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजनवर कामकाज चालणारे एक हजारहून अधिक छोटे-मोठे कारखाने आहेत. अंबड औद्योगिक वसाहतीत सुमारे ८० टक्के ...
अंबड औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजनवर कामकाज चालणारे एक हजारहून अधिक छोटे-मोठे कारखाने आहेत. अंबड औद्योगिक वसाहतीत सुमारे ८० टक्के कारखाने हे ऑक्सिजनवर चालतात. फॅब्रिकेशन प्लाझ्मा कटिंग, प्रोफाइल कटिंग, रॉ मटेरियल कटिंग करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर केला जातो. गेल्या तीन-चार महिन्यांपासून या कारखान्यांतील सर्वच कामे ठप्प झाली असल्याने कारखानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता सरकारने उद्योगांना २० टक्के ऑक्सिजन देण्याची तयारी दर्शविली आहे. मुळात २० टक्के ऑक्सिजन दिल्यास कोणत्याही कारखान्याचे कामकाज हे साधारण दोन ते तीन तास इतकाच वेळ सुरू राहू शकते. यामुळे त्यांना काम करताना देखील अडचणी निर्माण होणार आहेत. आज देखील पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे वितरकांकडून सांगण्यात येत आहे. परंतु अशाही परिस्थितीत सरकारने उद्योगांसाठी केवळ २० टक्केच ऑक्सिजन दिल्यास कामकाज करणे अवघड होणार आहे.
चौकट
===
सरकारने पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन दिल्यास कारखानदार हे त्यांच्याकडे असलेल्या मालाचा साठा करून ठेवू शकतात. यामुळे भविष्यात ऑक्सिजन कमी-अधिक प्रमाणात मिळाला तरी कामकाज सुरळीत सुरू राहू शकते, अशी प्रतिक्रिया आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, गोविंद झा, सुधाकर चौधरी यांनी व्यक्त केली.