जिल्ह्यातील निर्बंधात शिथिलता मात्र काही मर्यादाही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 01:02 AM2022-02-02T01:02:01+5:302022-02-02T01:02:20+5:30
कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता दिलेली आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातही निर्बंध शिथिल होणार आहेत; मात्र राज्यातील ज्या अकरा जिल्ह्यांमध्ये अधिक शिथिलता देण्यात आलेली आहे त्यामध्ये अद्यापही नाशिकचा समावेश झालेला नाही. जास्तीत जास्त लसीकरण झाले तरच जिल्ह्याला अधिकची मुभा मिळणार आहे.
नाशिक : कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता दिलेली आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातही निर्बंध शिथिल होणार आहेत; मात्र राज्यातील ज्या अकरा जिल्ह्यांमध्ये अधिक शिथिलता देण्यात आलेली आहे त्यामध्ये अद्यापही नाशिकचा समावेश झालेला नाही. जास्तीत जास्त लसीकरण झाले तरच जिल्ह्याला अधिकची मुभा मिळणार आहे. राज्य सरकारने मंगळवारपासून (दि. १) राज्यात कोरोना निर्बंध अधिक शिथिल केले आहेत. त्यामुळे अंत्ययात्रेच्या उपस्थितीवरील मर्यादा उठविण्यात आली असून, सलून, स्पा ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवली जाणार आहेत. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आणि आठवडे बाजारदेखील सुरू होऊ शकतील; परंतु यापेक्षा अधिक मुभा जिल्ह्याला अद्यापही मिळालेली नाही. शासनाच्या आदेशानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पहिला डोस ९० टक्के व दुसरा डोस ७० टक्के झालेला आहे त्यांना रेस्टॉरंट, थिएटर्स, नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. अशाप्रकारचे राज्यात अकरा जिल्हे आहेत. त्यामध्ये नाशिकचा समावेश नसल्याने जिल्ह्यात या सुविधांवरील निर्बंध कायम राहाणार असल्याचे दिसते. खुल्या मैदानात किंवा सभागृहात विवाह असल्यास तेथे केवळ २५ टक्के उपस्थिती राहाणार आहे.
--इन्फो--
राज्य शासनाच्या आदेशानुसार पहिला डोस ९० टक्के आणि दुसरा डोस ७० टक्के झालेल्या जिल्ह्यांचा समावेश ‘अ’ परिशिष्ठमध्ये करण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील पहिल्या लसीकरणाचे प्रमाण ८२.८० टक्के, तर दुसऱ्या लसींचे प्रमाण ५२.२२ इतकेच असल्याने इतक्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश या परिशिष्ठमध्ये झालेला नाही. त्यासाठी लसीकरणाची गती महत्त्वाची ठरणार आहे.
--कोट--
जिल्हा पातळीवर आपण खुली पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय १५ दिवसांपूर्वी घेतला होता. तो उतरती रुग्णसंख्या पाहता रद्द करण्यात आला आहे. बाकी सर्व नियम राज्य शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे जसेच्या तसे लागू राहतील. लसीकरणावर आधारित अकरा जिल्ह्यांना राज्य शासनाने अधिक शिथिलता दिलेली आहे. अद्याप नाशिकचा समावेश यात झालेला नाही. नागरिकांनी लसीकरणाकरिता पुढे यावे. जेणेकरून त्या वाढीव शिथिलतासुद्धा आपल्या जिल्ह्याला मिळू शकतील.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी