ऐन कोरोना काळात एचआरसीटी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:17 AM2021-01-16T04:17:59+5:302021-01-16T04:17:59+5:30
नाशिक- महापालिकेने खरेदी केलेले एचआरसीटी आणि अनेक उपकरणे बिटको रुग्णालयात असूनदेखील त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्गच भरण्यात आला नाही. परिणामी ...
नाशिक- महापालिकेने खरेदी केलेले एचआरसीटी आणि अनेक उपकरणे बिटको रुग्णालयात असूनदेखील त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्गच भरण्यात आला नाही. परिणामी ऐन कोरोना काळात रुग्णांना खासगी लॅबमध्ये अशा प्रकारच्या चाचणीसाठी जावे लागले. त्यामुळे प्रशासनाला केवळ खरेदीतच रस असल्याचे उघड तर झाले आहेच; परंतु खासगी लॅबचालकांचे व्यवसाय तेजीत चालावे, यासाठीच हे उपकरण बंद ठेवल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. यासंदर्भात पक्षाच्यावतीने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देण्यात आले असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महापालिकेने अनेक यंत्र खरेदी केल्यानंतर ते वापराअभावी पडून असल्याची अनेक उदाहरणे आहेत, त्यात या प्रकरणाची भर पडली आहे. बिटको रुग्णालयात कोरोना उपचारासाठी व्यवस्था होती. त्यामुळे महापालिकेचे एचआरसीटी हे फुफ्फुसांचा संसर्ग तपासण्यासाठी आवश्यक असलेले यंत्र उपलब्ध असले तरी ते चालवण्यासाठी कर्मचारी वर्गच उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना तपासणीसाठी खासगी रुग्णालयात जावे लागले. एका वेळी चाचणीसाठी सहा हजार रुपये खासगी लॅबमध्ये द्यावे लागल्याने त्यांना लाखो रुपये बाहेरील लॅबचालकांना मिळाले आहेत. किंबहूना त्यासाठीच हे उपकरण बंद ठेवण्याचा घाट घालण्यात आला आहे, असा आराेप शिवसेनेने निवेदनात केला आहे.
शिवसेनेेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, सत्यभामा गाडेकर, नाशिकरोड प्रभाग समिती सभापती जयश्री खर्जुल, सूर्यकांत लवटे, डी. जी. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
इन्फो...
महापालिकेने काेरोना काळात सुमारे सातशे ते आठशे वैद्यकीय कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केले. त्याच धर्तीवर एचआरसीटी आणि अन्य आवश्यक ते तांत्रिक कर्मचारी नियुक्त करता आले असते; मात्र जाणिवपूर्वक ही भरती टाळण्यात आली. यामागे लॅबचालकांसाठी महापालिकेत लॉबी कार्यरत असल्याची शंका शिवसेनेने व्यक्त केली आहे.
----------
छायाचित्र आर फोटेा १५ शिवसेना महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील एचआरसीटी आणि अन्य उपकरणे बंद असल्याबाबत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देताना मनपातील विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते व महानगर प्रमुख सुधाकर बडगुजरसमवेत सूर्यकांत लवटे, जयश्री खर्जुल, सत्यभामा गाडेकर, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी आदी.