हुडहुडी : आठवड्यात दुस-यांदा राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाशिकची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 09:20 PM2017-11-15T21:20:06+5:302017-11-15T21:41:31+5:30
चालू आठवड्यात शहराच्या किमान तपमानाचा आलेख हा उतरता राहिला असून नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत असताना गेल्या तीन दिवसांपासून तपमानाचा पारा वर सरकत असल्याने थंडीपासून काहीसा दिलासा नाशिकरांना मिळत असला तरी पुन्हा याच आठवड्यात सलग दुस-यांदा राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाशिकची नोंद झाली
नाशिक : हंगामातील सर्वात निचांकी तपमानाची नोंद यावर्षी गेल्या रविवारी १०.४ अंश इतकी झाली होती. त्यामुळे नाशिक राज्यात सर्वाधिक थंड असलेले शहर म्हणून पुण्याच्या भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून जाहीर करण्यात आले होते; मात्र पुन्हा बुधवारी (दि.१५) किमान तपमान नाशिकला ११.७ नोंदविले गेले. सदर तपमानाचे शहर म्हणून नाशिक राज्यात एकमेव असल्याचे हवामान शास्त्राने जाहीर केले.
चालू आठवड्यात शहराच्या किमान तपमानाचा आलेख हा उतरता राहिला असून नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत असताना गेल्या तीन दिवसांपासून तपमानाचा पारा वर सरकत असल्याने थंडीपासून काहीसा दिलासा नाशिकरांना मिळत असला तरी पुन्हा याच आठवड्यात सलग दुस-यांदा राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाशिकची नोंद झाली आहे.
बुधवारी ११.७ इतके किमान तपमान नोंदविले गेले तरी सर्वाधिक थंडी ही नाशकात असून राज्यात या शहराइतके तपमान अहमदनगर, उस्मानाबाद किंवा महाबळेश्वरचे देखील नसल्याचे हवामान खात्याने नोंदविलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मागील वर्षी १५नोव्हेंबररोजी नाशिकचे तपमान १३.६ इतके नोंदविले गेले होते. गेल्या आठवड्यात शहराचे किमान तपमान १२ अंशाच्या जवळपास राहिले होते. यामुळे नाशिककरांना थंडी जाणवत नव्हती; मात्र रविवारपासून पुन्हा थंडीचा जोर वाढत असल्याने कडाक्याची थंडी नाशिकमध्ये अनुभवयास येत आहे.
नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असून नाशिककरांनी उबदार कपड्यांना नाशिककरांची मागणी वाढली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून संध्याकाळनंतर शेकोट्या पेटविल्या जात आहे. दुचाकी अथवा चारचाकीमधून प्रवास करतानाही नाशिककरांना उबदार कपड्यांचा वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे. वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नाशिककरांनी सातच्या आत घरात जाणे पसंत केले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर तसेच खाऊगल्ल्यांमध्ये शुकशुकाट पसरला होता. बाजारपेठांमध्येही वर्दळ रोडावल्याचे दिसून आले.