जुन्या नाशकात घराला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 02:59 AM2022-01-17T02:59:06+5:302022-01-17T03:00:53+5:30
अरुंद गल्लीबोळ अन् दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या जुन्या नाशकातील नानावली भागातील नागझिरी शाळेलगत असलेल्या एका घराला रविवारी (दि. १६) सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे आग लागली. सुदैवाने हे घर कुलूपबंद होते आणि अग्निशमन दलाने वेळीच शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. दोन बंबांच्या मदतीने आठ जवानांनी घराला लागलेली आग तासाभरात विझवली.
नाशिक : अरुंद गल्लीबोळ अन् दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या जुन्या नाशकातील नानावली भागातील नागझिरी शाळेलगत असलेल्या एका घराला रविवारी (दि. १६) सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे आग लागली. सुदैवाने हे घर कुलूपबंद होते आणि अग्निशमन दलाने वेळीच शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. दोन बंबांच्या मदतीने आठ जवानांनी घराला लागलेली आग तासाभरात विझवली.
नानावली परिसरात रविवारी सकाळी अंबादास हरिभाऊ शेलार यांच्या मालकीच्या एक मजली पत्र्याच्या लहान घरामध्ये वरच्या बाजूने आगीच्या ज्वाळा भडकल्या. घरातील लाकडी सामान व संसारोपयोगी वस्तू मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने संपूर्ण नानावली, शिवाजी चौक, कथडा या भागात धुराचे लोट पसरले होते. या घटनेची माहिती शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयाला समजताच लिडिंग फायरमन श्याम राऊत, शिवाजी फुगट, दिनेश लासुरे, बंबचालक नाजिम देशमुख हे अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले. रस्ता अरुंद असल्याने घटनास्थळापासून लांब अंतरावर अग्निशमन दलाला बंब उभा करावा लागला. तेथून पाईपच्या सहाय्याने पाण्याचा मारा करत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, शार्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
---इन्फो---
भाडेकरुंचा संसार बेचिराख
या घरात भाडेकरु मनोजकुमार व संजीवकुमार चव्हाण हे राहात होते. या दुर्घटनेत संसारोपयोगी वस्तू बेचिराख झाल्या. तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
इन्फो-
बघ्यांची गर्दी; अरुंद रस्ते
जुने नाशिक गावठाण भागात जेव्हा-जेव्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, तेव्हा बघ्यांची गर्दी व अरुंदी गल्लीबोळातील रस्ते या समस्यांचा मोठा अडथळा भेडसावतो. या घटनेवेळीही हीच समस्या समोर आली. जवानांना आग विझविण्याचे काम करताना बघ्यांच्या गर्दीला सामोरे जावे लागले.
इन्फो
लहान सिलिंडर फुटले
आगीचा मुख्य स्रोत हा वरच्या खोलीत होता. आग विझवताना घरामधील टीव्ही तसेच एका लहान सिलिंडरचा स्फोट झाल्याचे जवानांनी सांगितले. दाट लोकवस्ती असल्याने आगीचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेता, पंचवटी उपकेंद्राची अतिरिक्त मदत घेतली गेली. अवघ्या पाच मिनिटात पंचवटी केंद्राचा बंब व जवान घटनास्थळी दाखल झाले. घरातून एक भरलेला सिलिंडर व एक रिकामा सिलिंडर स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.