सद्गुरुंच्या नामस्मरणात प्रचंड सामर्थ्य : शांतिगिरीजी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 01:08 AM2021-12-17T01:08:21+5:302021-12-17T01:08:55+5:30
‘न करिता सद्गुरुंचे भजन, नोव्हे भव वृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधन, आणे आण केलीया’ या एकनाथी भागवतातील एकच ओवीतून सद्गुरुंच्या नामाला किती मोठे महत्त्व आहे हे लक्षात येईल. म्हणूनच सद्गुरुंच्या नामाचा आणि सद्गुरुंच्या कामाचा कधीही विसर पडू देऊ नका. सद्गुरुंच्या नामात प्रचंड सामर्थ्य आहे, ते प्रत्येकाने ओळखावे, असे प्रतिपादन जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधिश्वर शांतिगिरीजी महाराज यांनी केले.
ओझर : ‘न करिता सद्गुरुंचे भजन, नोव्हे भव वृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधन, आणे आण केलीया’ या एकनाथी भागवतातील एकच ओवीतून सद्गुरुंच्या नामाला किती मोठे महत्त्व आहे हे लक्षात येईल. म्हणूनच सद्गुरुंच्या नामाचा आणि सद्गुरुंच्या कामाचा कधीही विसर पडू देऊ नका. सद्गुरुंच्या नामात प्रचंड सामर्थ्य आहे, ते प्रत्येकाने ओळखावे, असे प्रतिपादन जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधिश्वर शांतिगिरीजी महाराज यांनी केले.
निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होत असतो. मात्र यंदा कोरोना संकटामुळे या कार्यक्रमाचे दोन ठिकाणी विभाजन करण्यात आले. श्रीक्षेत्र वेरूळ आणि श्रीक्षेत्र ओझर येथे पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. वेरूळ येथील लक्ष्यवेधी सोहळ्याबरोबरच ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथेही जगद्गुरु बाबाजींचे ३२वे पुण्यस्मरण मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. जपानुष्ठान, १११ कुंडात्मक महायज्ञ, नामसंकीर्तन, अखंड नंदादीप, महिला जप, हस्तलिखित नामजप आदी विविध उपक्रमांसह या संपूर्ण सोहळ्याची सांगता यावेळी करण्यात आली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर बाबाजींच्या मूर्तीस महाभिषेक संपन्न झाला. यानंतर नित्यनियम विधी, प्राणायाम, ध्यान, भागवत वाचन, महाआरती संपन्न झाली. यावेळी शांतिगिरीजी महाराज यांनी भाविकांना धर्म उपदेश केला.
इन्फो
भाविकांसाठी आरोग्य शिबिर
कार्यक्रमादरम्यान भाविकांच्या आरोग्यासाठी योग, प्राणायाम, आरोग्य शिबिर पार पडले. आयुर्वेदाची विशेष माहिती यावेळी देण्यात आली. ओम जनार्दनाय नमः नामाचा जप करत, भजन करत नाचून-गाऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बाबाजींच्या प्रचंड जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.