रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:15 AM2021-04-09T04:15:20+5:302021-04-09T04:15:20+5:30
नाशिक : जिल्ह्यात रेमडेसिवीर औषधाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक दुकानांमधून रेमडेसिवीरची विक्री जादा दराने होत असल्याचे ...
नाशिक : जिल्ह्यात रेमडेसिवीर औषधाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक दुकानांमधून रेमडेसिवीरची विक्री जादा दराने होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने थेट रुग्णालयांनाच रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याबाबत निर्णय घेतला असला तरी तोपर्यंत शेकडो रुग्णांच्या नातेवाईकांना काळ्या बाजारातून किंवा जादा दराने रेमडेसिवीर घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
गत सप्ताहापर्यंत जिल्ह्यात रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीतपणे सुरु होता. मात्र, गत आठवड्याच्या मध्यानंतर रेमडेसिवीरच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली. दरम्यानच्या काळात जिल्ह्यात ४५०० रेमडेसिवीरचा पुरवठा उपलब्ध होता. तसेच १२ हजार रेमडेसिवीरची मागणी उत्पादकांकडे नोंदवण्यात आली. मात्र, दरम्यानच्या काळात रेमडेसिवीरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर तेवढ्या प्रमाणात उत्पादकांकडून पुरवठा होऊ न शकल्याने रेमडेसिवीरचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन रेमडेसिवीर आणून देण्यास सांगितले. त्यामुळे योग्य दरात रेमडेसिवीर देणाऱ्या औषधी दुकानांवर ग्राहकांच्या रांगाच रांगा दिसून आल्या. तर अन्य काही दुकानांमध्ये चढ्या दराने रेमडेसिवीर घेण्याशिवाय नागरिकांपुढे पर्याय उरलेला नाही. काही दुकानांमध्ये ५ ते ६ हजार रुपयांना रेमडेसिवीरची विक्री होत असून निर्धारित दरांना विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये ते १२०० रुपयांना मिळत होते. त्यामुळेच अशा दुकानांसमोर मोठ्या रांगांचे चित्र गत दोन दिवसांपासून कायम आहे.
इन्फो
अन्न-औषध प्रशासन सह आयुक्तपदी भामरे
अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सह आयुक्तपदी डी. एम. भामरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट बहरात असतानाच रेमडेसिवीरच्या पुरवठ्यात यंत्रणा कमी पडल्याने ही नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी माधुरी पवार यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.