झाडांना मानवी अन् नैसर्गिक धोका
By admin | Published: August 1, 2016 12:57 AM2016-08-01T00:57:21+5:302016-08-01T00:59:51+5:30
सर्वेक्षण गरजेचे : निष्काळजीपणे केलेल्या छाटणीमुळे सुरक्षिततेला छेद
नाशिक : मागील काही दिवसांपासून शहरात वृक्ष कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासनाने शहरातील धोकेदायक वृक्षांचे सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, वृक्ष कोसळण्यामागे नैसर्गिक कारणांबरोबरच विकृत मनोवृत्तीमधून केले जाणारे कृत्यही कारणीभूत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.वकीलवाडीमध्ये दोन आठवड्यापूर्वी कडुनिंबाचे सुमारे चाळीस वर्ष जुने झाड अचानकपणे बुंध्यापासून तुटून कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र झाडे कोसळण्यामागची कारणमीमांसा महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून केली जात नाही.
फांद्यांची छाटणी करून धोका कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अशास्त्रीय छाटणीमुळे वृक्षाची सुरक्षितताच धोक्यात येते. याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. ‘लोकमत’ने यापूर्वीच ‘अशास्त्रीय छाटणीमुळे वृक्षांचा धोका वाढतो’ याकडे लक्ष वेधले होते. जीर्ण वृक्ष तसेच वाळवी लागून कुजलेल्या बुंध्याचे वृक्ष किंवा नुसतीच ओंडक्याच्या स्वरूपात दिसणाऱ्या झाडांचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. वृक्षारोपण मोहिमेत शहराच्या अनेक भागात नवीन झाडे लावली जातात. परंतु गेल्या अनेक वर्षापासून शहरात उभी असलेल्या झाडांची मात्र काळजी घेतली जात नाही. (प्रतिनिधी)