मानव-बिबट्या संघर्ष सहजरित्या टाळता येऊ शकतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:20 AM2019-03-31T00:20:32+5:302019-03-31T00:21:57+5:30

खत प्रकल्पाच्या कचऱ्यामुळे कुत्र्यांची वाढती संख्या आणि राखीव वनक्षेत्राचा नैसर्गिक अधिवास यामुळे हे बिबट्याचे पसंतीचे ठिकाण बनले असावे. त्यामुळे या भागात वावरताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. बिबट्याचे जीवशास्त्र आणि बिबट-मानव संघर्ष टाळण्यासाठी काय उपाययोजना करू शकतो, याविषयी जाणता वाघोबा प्रकल्पाच्या समन्वयक वन्यजीव अभ्यासक मृणाल घोसाळकर यांच्याशी साधलेला संवाद...

 Human-leopard struggles can be easily avoided ... | मानव-बिबट्या संघर्ष सहजरित्या टाळता येऊ शकतो...

मानव-बिबट्या संघर्ष सहजरित्या टाळता येऊ शकतो...

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांनी आपआपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावाबिबट्याला पकडून दुसरीकडे नेऊन सोडल्यास समस्या अधिक भीषण

‘त्रिरश्मी लेणी’चा परिसर राखीव वनक्षेत्र असल्याने खबरदारी गरजेची
नाशिकच्या ‘त्रिरश्मी लेणी’ डोंगराचा परिसर राखीव वनक्षेत्र आहे. तसेच या भागाजवळच महापालिकेच्या खत प्रकल्पाचा डेपो आहे. यामुळे बिबट्याचा वावर या भागात असणे स्वभाविक आहे. कारण खत प्रकल्पाच्या कचऱ्यामुळे कुत्र्यांची वाढती संख्या आणि राखीव वनक्षेत्राचा नैसर्गिक अधिवास यामुळे हे बिबट्याचे पसंतीचे ठिकाण बनले असावे. त्यामुळे या भागात वावरताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. बिबट्याचे जीवशास्त्र आणि बिबट-मानव संघर्ष टाळण्यासाठी काय उपाययोजना करू शकतो, याविषयी जाणता वाघोबा प्रकल्पाच्या समन्वयक वन्यजीव अभ्यासक मृणाल घोसाळकर यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : बिबट्याचा शहराजवळ अथवा ग्रामीण भागात वाढता वावर हा धोक्याचा ठरू लागला आहे का?

उत्तर : बिबट्याचा वाढता वावर हा धोक्याचा तेव्हा ठरेल, जेव्हा नागरिक निष्काळजी व बेजबबादारपणे वागतील तेव्हा. बिबट्यासारख्या वन्यजीवासोबत मनुष्याच्या जमाती फार पुर्वीपासून सहजीवनाने राहत आल्या आहेत. त्यामध्ये आदिवासी, कोळी, वारली, गोंड आदि लोक मांजरवर्गीय वन्यप्राण्यांसोबत राहत आले आहेत, हे आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे मनुष्यप्राण्याने बिबट्याला शहरी वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी त्याला हवे असलेली संसाधने कमी करण्यावर भर दिला पाहिजे. बिबट्या नाशिकच्या मळे भागात वास्तव्य करून आहेत, यात शंका नाही; मात्र मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी सजग राहून काही नियम स्वत:साठी लागू करून घेतले पाहिजे.

प्रश्न : मानवाने खबरदारी घ्यावी, म्हणजे नेमके काय करावे?
उत्तर: अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. नागरिकांनी मळे परिसराजवळ वास्तव्य करताना शेतीच्या बांधापासून काही अंतरावर घर बांधावे. आपले पाळीव प्राणी बंदीस्त गोठ्यात ठेवावेत तसेच गोठ्याच्या परिसरात पुरेसा प्रकाश असेल, अशी व्यवस्था करावी. सायंकाळी अंधार होण्याची वाट न बघता मळ्याचा परिसरत सोडून घराकडे निघावे. तसेच पहाट उजाडताच मळ्याकडे जाणे टाळावे, सुर्योदय झाल्यानंतर मळ्याच्या दिशेने हातात काठी वगैरे घेऊन निघावे. सर्व वन्यप्राणी माणसांना खूप घाबरतात हे लक्षात घ्यावे त्यामुळे बिबट्याच्या समोरासमोर जरी आलात तर घाबरून न जाता त्याला कुठल्याहीप्रकारच्या धोक्याची जाणीव न होऊ देता सावकाश त्याच्या नजरेआड होण्याचा प्रयत्न करावा. शहरी भागात नागरिकांनी आपआपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून बिबट्या आकर्षित होऊन भक्ष्याच्या शिकारीसाठी मानवी वस्तीत येणार नाही.

प्रश्न : आपला परिसर, सभोवतालची जागा स्वच्छ म्हणजे नेमकी कशी ठेवावी?
उत्तर : मांसाहारी वन्यप्राणी जसे की, अस्वल, बिबटे, लांडगे आदिसारखे वन्यजीव जेथे मुबलक व पुरेसे खाद्य आहेत, त्या परिसराकडे आकर्षित होतात. त्याचप्रमाणे बिबट्या, तरस आपल्या गावांत आणि शहरात कचरा असलेल्या जागी सामान्यपणे आढळून येणारे कुत्रे, डुक्करांसारख्या प्राण्यांची शिकार करून गुजराण करतात. एक जैविक यंत्रणा असते की जेव्हा अन्नाचे संसाधने वाढतात तेव्हा, लहान वयातच मादी प्रजनन करण्यास सुरूवात करते आणि त्यापैकी बरीच पिल्ले जगतात, पण दुसरीकडे बघितले असता जर अन्न कमी प्रमाणात उपलब्ध असेल तर, त्यांची उत्त्पत्त्ती उशिराने सुरू होते. त्यांची पिल्ले नैसर्गिकरित्या रोगराईमुळे मरण पावतात, हे सत्य माणसापासून ते कुत्र्यापासून तर बिबट्यापर्यंत सर्व जीवांना लागू होते. म्हणून कुत्रे, डुकरे आणि बिबटे यांची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या अन्नाची संसाधने कमी करणे हा एक चांगला उपाय ठरू शकतो. यामुळे बिबटे अन्नाच्या शोधात जास्त मोठ्या विभागात भटकंतीला सुरूवात करतात व त्यांची संख्या नैसर्गिकपणे नियंत्रणात राहते.

प्रश्न : पिंजरा लावून बिबट्याला पकडणे व दुसरीकडे सोडणे हा उपाय ठरू शकतो का?
उत्तर : अहमदनगरच्या शेतजमीनिमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात असे निदर्शनास आले की, एका बिबट्याचे क्षेत्र साधारणत: १५ चौरस किलोमीटर इतके असल्याचे आढळून आले. मांजरीप्रमाणे बिबटेही दूर कोठेतरी नेऊन सोडल्यास परत आपल्या मुळ घराकडे परतण्याचा प्रयत्न करतात. आफ्रिकेत घरी (मुळ गावी) परतण्यासाठी त्यांनी ३०० कि.मीपर्यंतचा प्रवास केल्याची नोंद आढळते. भारतातही ‘रेडिओकॉलर’ लावलेले बिबटे (सिता, जय महाराष्टÑ, लक्षय) त्यांना जेथून पिंजऱ्यात जेरबंद केले तेथे पुन्हा परतले होते.
बिबट्यांना त्यांच्या क्षेत्रातून काढून दुसरीकडे नेऊन सोडल्यामुळे उभी राहणारी दुसरी समस्या म्हणजे त्यांना जेथे नेऊन सोडले आहे, त्या ठिकाणी मग, ते जंगल असले तरी ते आधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता असते. कारण भारतात कोणत्याही भागात माणसे वास्तव्यास आहेतच, अगदी जंगलातही. या बिबट्यांचा जन्मच माणसांचा वावर असलेल्या भागात (ऊसाची शेती) झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही माणूस विरहित झाडाझुडुपांचे क्षेत्र बघितले नसल्यामुळे जंगलात सोडल्यामुळे त्यांची पहिलीच प्रतिक्रिया गावाकडे माणसे असलेल्या प्रदेशात जाण्याची असते.
बिबट्याचेही आपले एक कुटुंब असते. ज्यामध्ये पिल्ले अडीच वर्षांची होईपर्यंत आपल्या आईसोबत राहतात अणि नंतर स्वत:चे ‘घर’ शोधत फिरतात. कोणत्याही रिकाम्या नैसर्गिक लपण उपलब्ध असलेल्या क्षेत्राचा ते ताबा घेतात. ते वयाने लहान असल्याने जेथे आधी एकच बिबट्या वास्तव्य करून होता, त्या क्षेत्रात आता एकापेक्षा जास्त बिबटे वास्तव्यास आलेले असतात. पिंजरा लावून बिबट्याला पकडून दुसरीकडे नेऊन सोडल्यास समस्या अधिक भीषण होऊन अगोदर माणसांसाठी घातक ठरू न पाहणारे बिबटे अधिक आक्रमक व धोकादायकदेखील ठरू शकतात.

मुलाखत : अझहर शेख, नाशिक

Web Title:  Human-leopard struggles can be easily avoided ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.