धक्कादायक! बंद गाळ्यात आढळले आठ मानवी कान, मेंदू, डोळे; नाशिकमध्ये एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 08:27 AM2022-03-28T08:27:10+5:302022-03-28T08:32:40+5:30

नाशिक: मुंबई नाका पोलीस ठाण्यामागे असलेल्या हरिविहार सोसायटीतील २० आणि २१ क्रमांकांचे दोन गाळे आहेत. हे गाळे मागील अनेक ...

human organs found in nashik police starts investigation | धक्कादायक! बंद गाळ्यात आढळले आठ मानवी कान, मेंदू, डोळे; नाशिकमध्ये एकच खळबळ

धक्कादायक! बंद गाळ्यात आढळले आठ मानवी कान, मेंदू, डोळे; नाशिकमध्ये एकच खळबळ

googlenewsNext

नाशिक: मुंबई नाका पोलीस ठाण्यामागे असलेल्या हरिविहार सोसायटीतील २० आणि २१ क्रमांकांचे दोन गाळे आहेत. हे गाळे मागील अनेक वर्षांपासून बंद होते. यांपैकी एका गाळ्यातून विचित्र प्रकारची दुर्गंधी नागरिकांना मागील दोन दिवसांपासून येत होती. त्यामुळे दुर्गंधी कोठून येते याचा रहिवासी शोध घेत होते. रविवारी गाळ्याच्या शटरचा पत्रा एका बाजूने कुजलेला असल्याचे दिसले. तेथून दुर्गंधी सुटत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचा ‘डायल ११२’ क्रमांक फिरवून माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला.

उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, आनंदा वाघ, सुनील रोहकले यांसह न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा चमू (फॉरेन्सिक) घटनास्थळी काही वेळेत पाेहोचला. गाळा उघडला असता त्यामध्ये सर्व भंगार माल साठवून ठेवलेला आढळला. यामध्ये लाकडी साहित्यापासून विविध लोखंडी वस्तू होत्या. या भंगारात प्लास्टिकचे दोन डबे वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असल्याचा पोलिसांना संशय आल्याने ते डबे जेव्हा पोलिसांनी उघडले तेव्हा दुर्गंधीचा एकच लोट पसरला. पोलिसांनी नाकातोंडाला मास्क लावून बॅटरीच्या साहाय्याने पाहणी केली असता द्रव रसायनामध्ये मानवी अवयव जतन करून ठेवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. फॉरेन्सिक चमूने हे दोन्ही डबे ताब्यात घेतले. पोलिसांनी गाळामालक महिला शुभांगिनी शिंदे यांना बोलाविले. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांना जे डॉक्टर आहेत, त्यांनाही पोलिसांनी या ठिकाणी बोलावून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत त्यांची पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती.

वैद्यकीय अभ्यासाकरिता अवयव ठेवल्याचा संशय
शिंदे कुटुंबीयांची दोन्ही मुले शहरात डॉक्टर आहेत. एक डेन्टिस्ट, तर दुसरा कान, नाक, घसा तज्ज्ञ आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी या गाळ्यात मानवी अवयव वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी आणले असावे, असा पोलिसांना प्रथमदर्शनी संशय आहे. याबाबत दोन्ही डॉक्टर बंधूंनी घटनास्थळी पोलिसांना कुठल्याही प्रकारची ठोस माहिती सांगितली नाही. गाळा यापूर्वी कोणाला भाडेतत्त्वावर दिला होता? हेदेखील त्यांना सांगता आले नाही. यामुळे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मानवी अवयव ज्या पद्धतीने जतन करून ठेवले गेले ती पद्धत वैद्यकशास्त्राशी निगडित वाटते. अवयवांची कापणीदेखील अत्यंत शार्प असून आठ कान डब्यातून मिळालेले आहेत. तसेच मेंदूसदृश काही अवयवही आढळले आहेत. गाळा ज्यांचा आहे, ते दोन्ही भाऊ डाॅक्टर असून त्यांच्याकडे याबाबत चौकशी केली जात आहे. त्यांच्या या गाळ्यात मागील इतक्या वर्षांपासून मानवाचे हे अवयव कसे आले व कोठून आणले याचा तपास सुरू आहे.
- पौर्णिमा चौगुले, पोलीस उपायुक्त

Web Title: human organs found in nashik police starts investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.