संतांच्या संगतीने मानवाची प्रगती
By Admin | Published: December 28, 2015 10:11 PM2015-12-28T22:11:15+5:302015-12-28T22:17:00+5:30
माधवगिरी महाराज : जनार्दन स्वामी पालखी सोहळा
पंचवटी : सध्याच्या विज्ञान युगात तांत्रिक प्रगती होत आहे, मात्र मानवाची वैचारिक प्रगती होत नसल्याने जीवन भकास होत चालले आहे. इतर तंत्रज्ञानामुळे मुले संस्कारहीन होत असल्याने संतांची संगत गरजेची आहे. यामुळेच मानवाची प्रगती होऊन सुख, समाधान लाभते, असे मत संत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य माधवगिरी महाराज यांनी मांडले.
हिरावाडी (शक्तीनगर) येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने संत जनार्दन स्वामी महाराज यांचा पालखी सोहळा व भजन, प्रवचन, सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी माधवगिरी महाराज यांचे प्रवचन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुढे असे सांगितले की, नाशिकही पवित्र अशी भूमी आहे. संतांच्या संगतीने भक्ती आणि धर्मात वाढ होते. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे म्हणून संस्कृत भाषेला देवभाषा असेही संबोधतात. संस्कृत भाषा समजायला कठीण असली तरी ती आत्मसात केल्यास वाणी शुद्ध होते, असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी संतोषगिरी महाराज यांचा भजन गायनाचा कार्यक्रम झाला. सकाळी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर संत जनार्दन स्वामी महाराजांच्या प्रतिमेची परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. स्व. मीनाताई क्रीडा संकुल येथून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. संपूर्ण हिरावाडी परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आल्यानंतर संकल्प लॉन्ड्री येथे कार्यक्रमस्थळी समारोप करण्यात आला. या पालखी मिरवणुकीनंतर भजन, प्रवचनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रभाग सभापती सुनीता शिंदे, नगरसेवक रुचि कुंभारकर आदिंसह भाविक उपस्थित होते. सायंकाळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
पालखी सोहळा यशस्वीतेसाठी संजय बुंदेले, अनिल चव्हाण, संजय भवर, दादा आमले, योगेश चव्हाण, नितीन बुंदेले, योगेश दौडे, विश्वनाथ बोडके, करण जाधव, तुषार विभांडिक, बंडू साबळे आदिंसह छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हातभार लावणाऱ्या परिसरातील सर्व देणगीदार, हितचिंतक यांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले. (वार्ताहर)