भेटवस्तू, पुष्पगुच्छांऐवजी समाजकार्यासाठी हुंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 06:33 PM2019-05-16T18:33:23+5:302019-05-16T18:34:39+5:30
अभिनव उपक्रम : शिंपी समाजाध्यक्षाने पाडला पायंडा
नाशिक : स्वागत समारंभ अथवा विवाह सोहळा म्हटला की, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ आलेच. बव्हंशी भेटवस्तू या घरातील माळ्यावरची अडगळ ठरतात तर पुष्पगुच्छाचे निर्माल्य दुसऱ्या दिवशी घंटागाडीत फेकले जाते. भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांवर हजारो रुपये खर्च होतात आणि तो वायाही जातो. मात्र, याच भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांऐवजी विवाह सोहळ्यात थेट हुंडी ठेवून समाजातील गरीब-गरजूंच्या उत्थानासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करणारा उपक्रम क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे अध्यक्ष सुनील निकुंभ यांनी आपल्या कन्येच्या विवाह समारंभात राबविला आणि समाजातील सर्वांनीच या अनोख्या उपक्रमाचे अनुकरण करण्याचा सल्ला प्रसिद्ध सिनेअभिनेता गोविंद नामदेव यांनी यावेळी दिला.
अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे अध्यक्ष सुनील निकुंभ यांच्या कन्येचा विवाह नुकताच झाला. या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतच निकुंभ यांनी नवदाम्पत्यास शुभाशिर्वाद देण्यात येणाºया पाहुण्यांना कोणतीही भेटवस्तू अथवा पुष्पगुच्छ आणण्याऐवजी विवाहस्थळी ठेवलेल्या हुंड्यांमध्ये रोख स्वरुपात आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले. सदर हुंड्यामधून जमा झालेला निधी आणि त्यात स्वत: निकुंभ कुटुंबीयांकडून काही रकमेची भर घालत त्याचा वापर समाजातील गरजू आणि गरीब लोकांच्या उत्थानासाठी करण्याचा संकल्प सोडण्यात आला. त्यानुसार, विवाहस्थळी जागोजागी हुंड्या ठेवण्यात आल्या आणि आलेल्या पाहुण्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत त्याला भरभरुन प्रतिसादही दिला. यावेळी उपस्थित राहिलेले प्रसिद्ध सिनेअभिनेते गोविंद नामदेव यांनी समाजामध्ये लग्नविधीत अनेक रूढी ,परंपरा, मानपान यांना फाटा देऊन त्यातून जमा झालेली रक्कम समाजातील गरजू, गरीब समाज बांधवांसाठी वापरली तर कन्यादानाचे पुण्य लाभेल, असा सल्ला दिला. स्वत: अध्यक्षाने स्वत:पासून या उपक्रमाची सुरुवात करत पायंडा पाडल्याने समाजातील पदाधिकाऱ्यांनी त्याचे अनुकरण इतरांनीही करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प सोडला.
कन्येच्या विवाहापासून उपक्रमाची सुरुवात
भेटवस्तू, पुष्पगुच्छ यावर हजारो रुपये खर्च होतो. त्यातील बराच वाया जातो. सदर अहेर सप्तात्री लागावा आणि समाजातील उपेक्षितांसाठी त्याचा काही वापर करता येईल काय, असा विचार पुढे आला आणि कन्येच्या विवाहापासून या उपक्रमाची सुरुवात केली. समाजबांधव आपल्याही सोहळ्यात हा पायंडा पुढे नेतील अशी अपेक्षा आहे.
- सुनिल निकुंभ, अध्यक्ष, शिंपी समाज