शंभरफुटी रस्ता खड्डेमय
By Admin | Published: July 21, 2016 10:37 PM2016-07-21T22:37:01+5:302016-07-21T22:38:31+5:30
शंभरफुटी रस्ता खड्डेमय
इंदिरानगर : वडाळागावातून जाणारा सावित्रीबाई झोपडपट्टीलगतचा १00 फुटी रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सिंहस्थ कुंभमेळा अगोदर मुंबई-आग्रा महामार्ग समांतर रस्ता ते वडाळागावापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरून राजीवनगर झोपडपट्टी, राजे छत्रपती चौक, राजसारथी सोसायटी, वडाळागाव, डीजीपीनगर क्रमांक १ आदि मार्गे पुणे महामार्गास जवळचा मार्ग असल्याने वाहनधारकांना सोयिस्कर झाले होते. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते.
गेल्या शनिवारी व रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने सावित्रीबाई झोपडपट्टी लगतच्या १00 फुटी रस्त्यास लहान-मोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने वाहने घसरून लहान-मोठे अपघात होत आहे. तसेच वाहनांचे नुकसानही होत आहे. सुमारे दहा महिन्यांपूर्वीच करण्यात आलेले डांबरीकरण उखडत असून, काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.