मालेगावी आगीत शंभर झोपड्या खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:58 AM2018-10-28T00:58:35+5:302018-10-28T00:59:07+5:30
शहरातील गोल्डननगर भागातील नागछाप झोपडपट्टीला अचानक आग लागून सुमारे १०० झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत नऊ घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला, तर संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. बघ्यांची गर्दी व अरूंद रस्त्यांमुळे मदत कार्यास अडथळा निर्माण झाला होता.
मालेगाव : शहरातील गोल्डननगर भागातील नागछाप झोपडपट्टीला अचानक आग लागून सुमारे १०० झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत नऊ घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला, तर संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. बघ्यांची गर्दी व अरूंद रस्त्यांमुळे मदत कार्यास अडथळा निर्माण झाला होता. शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील गोल्डननगर भागातील नागछाप झोपडपट्टीला अचानक भीषण आग लागली. प्रारंभी लागलेल्या आगीने काहीवेळातच रौद्ररूप धारण केले होते. नागछाप झोपडपट्टीतील घरे अगदी जवळ असल्याने आग वाढत गेली. या आगीत सुमारे १०० झोपड्या जळून खाक झाल्या. तसेच संसारोपयोगी वस्तू, धान्य, साहित्य जळून खाक झाले. आगीने धारण केलेल्या रौद्रारूपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
या भागातील नागरिकांनी जीव मुठीत धरून घरातील सिलिंडर उचलून वस्तीबाहेर पळ काढला. या आगीमुळे सुमारे ९ घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच मालेगाव अग्निशमन दलाचे सात बंब, मनमाड, सटाणा, धुळे येथील बंबांनी सुमारे ५० फेऱ्या मारून तब्बल साडेतीन तास शर्थीॅच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. घटनास्थळी महापौर रशीद शेख, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, अग्निशमन दल विभागप्रमुख संजय पवार आदिंनी धाव घेऊन आढावा घेतला. आयेशानगरचे पोलीस निरीक्षक मसूद खान, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्ही. एन. ठाकूरवाड आदींसह पोलीस कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त ठेवत अग्निशमन दलाच्या बंबांना रस्ता मोकळा करून दिला होता. महसूल विभागाकडून या आगीच्या नुकसानीची पंचनामे केले जाणार आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.
टारगट तरुणांमुळे अग्निशमन बंबाला अडथळे
रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आग विझविण्याच्या कामात अधिकारी व कर्मचाºयांना अडचणी निर्माण होत होत्या. काही टारगट तरुणांमुळे अग्निशमन बंब घटनास्थळी नेण्यासाठी अडथळे निर्माण झाले होते.