शेकडो जनावरे गेल्याने लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:18+5:302021-09-12T04:17:18+5:30
नांदगाव : ८ सप्टेंबर रोजी आलेल्या पुराने शेकडो जनावरे वाहून गेल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यात नद्या-नाल्यांना ...
नांदगाव : ८ सप्टेंबर रोजी आलेल्या पुराने शेकडो जनावरे वाहून गेल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यात नद्या-नाल्यांना मोठे पूर आले. त्यात सुमारे १०० ते १२५ लहान मोठी पाळीव जनावरे वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. बैल, गाय, म्हैस अशी १८ मोठी जनावरे, शेळ्या मेंढ्या १९ व पोल्ट्री फार्मचे ७००० पक्षी वाहून गेल्याचे पंचनामे पशुधन विभागाने केले असल्याची माहिती डॉ. नवनाथ ताठे यांनी दिली. त्यांची एकत्रित किंमत दहा लाख रुपये आहे. याव्यतिरिक्त पुरात वाहून गेलेल्या जनावरांची संख्या १०० ते १५० च्या दरम्यान आहे. तलाठी व ग्रामसेवक यांनी पंचनामे केले आहेत. दहेगाव, साकोरे ते न्यायडोंगरी या दरम्यान नदीकाठी असलेल्या छोट्या वस्त्या व गावे यातील पशुधन पुरात गमावले आहे.
----------------------
अफवा पसरविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
नांदगाव : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नांदगाव दौऱ्यात दहेगाव धरण फुटल्याची अफवा पसरवून जनतेला वेठीस धरणाऱ्या अंकुश थोरात(३५) व काळी आव्हाड (२५) या दोघा संशयितावर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे करीत आहेत.
-------------------------
जमियत उलमा ए हिंदतर्फे पूरग्रस्तांना मदत
नांदगाव : येथील जमियत उलमा ए हिंद मनमाडतर्फे शहरातील पूरग्रस्तांना मदत म्हणून टेम्पो भर ब्लँकेट,चादरी व खाण्याची पाकीट वाटप करण्यात आले. लोकांसमोर हे एक भयानक संकट निर्माण झाले आहे, या भयावह परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासत जमियत उलमा ए हिंद रात्रीच्या वेळी नांदगाव शहरात दाखल होऊन रिलीफ कार्य केले. जमियत उलमा ए हिंद मनमाड टीमतर्फे नांदगाव पूरग्रस्त भागांची पाहणी करून भविष्यात पूरग्रस्त लोकांचे पुनवर्सन व्हावे यावरदेखील जमियत उलमा ए हिंद कार्य करणार असल्याचे मत मनमाडचे अध्यक्ष हाजी रफिक यांनी सांगितले. यावेळी जमियत उलमा हिंद मनमाड शहराध्यक्ष हाजी रफिक, उपाध्यक्ष फिरोज शेख,मौलाना तौसिफ,शहर सचिव कादिर शेख, जुबेर हाजी, खजिनदार कयाम सैय्यद यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, या मदत कार्यात हाशिम मर्चंड, व डॉ फरीद यांनी सहकार्य केले.
----------------------